अर्नाळा आगारातून कोकणात जाणारी एसटी सेवा बंद

अर्नाळा आगारातून कोकणात जाणारी एसटी सेवा बंद

वसई : महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या अर्नाळा आगारातून सकाळी 7.45 वाजता नियमित सुटणारी अर्नाळा-गुहागर व 7.50 वाजताची अर्नाळा-तुळजापूर ही एसटी बंद करण्यात आली आहे. तसेच दुपारी 12.30 वाजता नियमित सुटणारी अर्नाळा-विरार-पोलादपूर व सायंकाळी 6.30 वाजता अर्नाळा आगारात येणारी पोलादपूर-विरार-अर्नाळा या एसटीच्या सेवाही खंडित करण्यात आल्याने कोकणात जाणार्‍या प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्स वगळता नालासोपारा व अर्नाळा एसटी आगारातून सुटणार्‍या एसटी बस हा एकमेव पर्याय सामान्य प्रवाशांजवळ कोकणात जाण्याकरता आहे. रेल्वेकरता प्रवाशांना दादर अथवा छत्रपती शिवाजी टर्मिनस गाठावे लागते. तर खासगी ट्रॅव्हल्सचे भाडेदर जास्त असल्याने व ते परवडत नसल्याने सामान्य प्रवाशांची पसंती एसटीच्या बसेसनाच जास्त आहे. त्यातही पोलादूर व आसपासच्या परिसरात प्रवास करण्याकरता एसटी हाच उत्तम पर्याय असल्याने अर्नाळा व नालासोपारा एसटी आगारातून कोकणात जाणार्‍या प्रवाशांची संख्याही जास्त आहे.

मात्र या आगारातून नियमित सुटणार्‍या या एसटीच्या फेर्‍या बंद करण्यात आल्याने अर्नाळा आगारातून सकाळच्या वेळात कोकणात जाण्या-येण्याकरता आता एकही एसटी उपलब्ध नाही. त्यामुळे कोकणात जाणार्‍या प्रवाशांचा भ्रमनिरास झालेला आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. कोकणी माणसाला अत्यंत प्रिय आणि त्याच्या हृदयाजवळचा हा सण आहे. या काळात एसटी महामंडळाने ही एसटी सेवा बंद करून कोकणी माणसांची निराशा केली आहे.

रात्रवस्ती करणारी बस सुरू करावी

त्यामुळे ही एसटी सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. किंबहुना या एसटी फेर्‍यांसोबत विरार-अर्नाळा एसटी आगारातून दुपारी 1 वाजता सुटून पोलादपूर येथे रात्रवस्ती करणारी बस सुरू करावी. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी सूचना प्रवाशांनी केली आहे. दरम्यान, लोकआग्रह व प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन ही एसटी सेवा तात्काळ पूर्ववत करा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी केली आहे.

First Published on: September 2, 2022 8:01 PM
Exit mobile version