पालघर समुद्रकिनाऱ्यावर कडेकोट बंदोबस्त

  पालघर समुद्रकिनाऱ्यावर कडेकोट बंदोबस्त

नदीम शेख,पालघर

महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथल्या समुद्रात बेवारस अवस्थेतील बोटीत सापडलेल्या हत्याराने खळबळ माजली असून 120 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा असलेला पालघर जिल्हा सुद्धा सावध झाला आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच डहाणू येथे असलेल्या तटरक्षक दलाकडूनही सतर्कता बाळगण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

पालघर जिल्ह्यात सुमारे 120 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथल्या समुद्रात बेवारस अवस्थेतील बोटीमध्ये हत्यारे सापडली असून समुद्र किनारपट्टी ठिकाणी कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता सावधानतेच्या सूचना पालघर पोलिसांकडून समुद्र किनारपट्टीवरील  जिल्ह्यातील  आठ सागरी पोलीस ठाण्यांना  सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड मधल्या घटनेनंतर दुपारपासून सर्व ठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. सर्व प्रभारी अधिकारी त्यांच्या हद्दीत बंदोबस्त करीत असून (एसओपी) कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात काम सुरू आहे. सुमारे शंभर ते दीडशे पोलीस समुद्रकिनाऱ्यावर लक्ष ठेवून असल्याचेही बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मच्छीमार सोसायटी यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारी बोटींना समुद्रात काही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आली आहे. मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) कार्यान्वित करण्यात आल्या असून मच्छीमार वस्त्यांमध्ये असलेली लहान मोठे गट जे समुद्रावर देखरेख ठेवण्याची काम करतात त्यांच्याशीही संपर्क साधण्यात आला असून समुद्रकिनाऱ्यावरून बाहेर पडणारे मार्ग म्हणजे जेटी बंदर या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी टॉवर्स आहेत तिथे टेहळणी पथक लक्ष ठेवून आहेत स्थानिक पातळीवर संपर्क साधण्यात येत असून तटरक्षक दलाशी ही संपर्क साधण्यात आला आहे असेही बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

फोर्स वनच्या धरतीवर जलद प्रतिक्रिया पथक तयार असून काही प्रसंग घडल्यावर त्याला सडेतोड जवाब देण्यासाठी टीम तयार ठेवण्यात आली आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक हत्यारे उपलब्ध असून त्यांना अति महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

First Published on: August 19, 2022 7:52 PM
Exit mobile version