विद्यार्थ्यांनी चित्रांचा,शिल्पकलेचा जास्त सराव करावा

विद्यार्थ्यांनी चित्रांचा,शिल्पकलेचा जास्त सराव करावा

वसईः विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि कॉप्युटरमध्ये जास्त न रमता आपली चित्रे,शिल्पकला याचा जास्तीत जास्त सरावा करावा. त्यातून त्यांना अनेक आयडीया तर मिळतीलच. पण, त्यांचा चांगला सरावा होईल, असा सल्ला सुप्रसिद्ध चित्रकार विलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला. वसईमधील वसई विकासिनीच्या वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाच्या कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी शिंदे बोलत होते. वसई विकास बँकेचे चेअरमन आशय राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. १९७६ च्या काळात आमच्या कॉलेजच्या विद्यार्थांचा ग्रुप वसईच्या किल्ल्यात स्केच आणि चित्र काढण्यासाठी येत होतो. आज याच भागातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा योग आला आहे. कॉलेज जरी लहान असले तरी त्याची कीर्ती फार मोठी आहे. येथील मुलांची चित्रे बघितल्यावर त्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचा आशावाद शिंदे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष नारायण मानकर यांनी केले. त्यांनी यावेळी अभ्यासक्रमाची माहिती, वर्षभरातील चांगल्या कलाकृतीचे प्रदर्शन, पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, १९९० पासून बालचित्रकला स्पर्धा, या 38 वर्षाचा आढावा घेतला.
माझ्या भागातील या कॉलेजचे नाव ऐकून होतो. याठिकाणी आल्यावर कॉलेजच्या मुलांनी केलेली प्रगती पाहून आनंद झाला. 29 विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पारितोषिक मिळतात. यावरूनच येथील शिक्षणाचा दर्जा समजतो. येथील प्राध्यापक जास्त वेळ देऊन काम करतात, हे उल्लेखनीय आहे. बोरिवली ते डहाणू विद्यार्थांसाठी कॉलेज वसईत असल्याचा सार्थ अभिमान आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत लागल्यास वसई विकास बँक मदत करण्यास तयार आहे, असे आश्वासन वसई विकास बँकेचे अध्यक्ष आशय राऊत यांनी दिले. शिरीष पाठारे,विजय वर्तक,संदेश जाधव ,जयंत देसले, विश्वस्त के.ओ.देवसी , माजी नगरसेविका किरण चेंदवणकर यावेळी उपस्थित होते.

First Published on: March 20, 2024 8:29 PM
Exit mobile version