साखरेनं तोंड कडू, महागाईने आलं रडू

साखरेनं तोंड कडू, महागाईने आलं रडू

वाडा : ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेच्या भावामध्ये प्रचंड दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांची दिवाळी गोड कशी होणार?असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.जुलैमध्ये ३७ रूपये किलो असणारी साखर आता ४५ रूपयांवर पोहचली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात साखरेच्या भावाने तोंड कडू होऊ लागले आहे. ही भाववाढ गोरगरीबांचे कंबरडे मोडणारी आहे. दसरा, दिवाळी हे मोठे सण ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये येतात. या दिवसांत गोडधोड पदार्थ बनवून खाणे ही परंपरा आहे. त्यामुळे साखरेची मागणी या महिन्यात निश्चित वाढते. सरकारही दरवाढ रोखून साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते.यावर्षी मात्र उसाचा हंगाम सुरू होण्याअगोदर आणि दिवाळी येण्याअगोदर दोन महिन्यांत साखरेचे भाव तब्बल आठ रूपयांनी वाढलेले आहेत.अगोदरच महागाईने मेटाकुटीस आलेले सर्वसामान्य या साखरेच्या भाव वाढीने पूर्णपणे वाकून जाणार आहेत. भाज्या शंभरीकडे वाटचाल करीत आहेत. पेट्रोल, डिझेलने शंभरी ओलांडली आहे.पोह्यांची दरवाढ झालेलीच आहे.शेंगदाणे महागच होत आहेत.दूध दरवाढ झालेली आहे. या सर्व दरवाढीत सर्वसामान्य गरीब होरपळून निघत आहेत.

गॅस सिलेंडर हजाराच्या पुढे,साखर पन्नाशीजवळ,भाजीपाला शंभरीजवळ अशी भरमसाट दरवाढ झाल्याने तीनशे – चारशे रूपयांत दिवस कसा काढायचा, असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने याकडे लवकर लक्ष वेधावे आणि महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
– प्रभावती पाटील, गृहिणी

First Published on: October 3, 2022 10:39 PM
Exit mobile version