रस्त्याच्या कामाला महापालिकेकडून स्थगिती

रस्त्याच्या कामाला महापालिकेकडून स्थगिती

वसई : विरार पश्चिमेकडे रस्ता रुंदीकरणासाठी चक्क खाडीपात्रात पंधरा फूट आत भिंत बांधून माती भराव केला आहे. त्याचबरोबर खाडीकिनारी असलेल्या झाडांचीही मोठ्या प्रमाणावर कत्तल केल्याची बाब भाजपचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी उघडकीस आणून तक्रार केल्यानंतर महापालिकेने बिल्डरला काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणाची चौकशीही सुरु केली आहे. विरार पश्चिमेच्या बोळींज खारोडी येथील मेंफेयर हाऊसिंग ( विरार गार्डन) च्या सुरू असलेल्या संकुलासाठी 20 मीटर रुंद रस्ता बनवण्यासाठी वसई विरार महापालिकेने विकासकाला परवानगी दिली होती.

सदर परवानगी देताना विविध शर्ती आणि अटी घालण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक खाड़ी प्रवाहाला कोणताही बाधा येणार नाही. तसेच रस्ता 20 मीटर रुंदीचा असेल, अशा प्रमुख अटी होत्या.
परंतु, प्रत्यक्षात या सर्व शर्तीचे सर्रास उल्लंघन करत विकासक व ठेकेदार यांनी मनमानी करत खाड़ीपात्रात 15 ते 17 फूट अतिक्रमण करून भिंत घालून भराव केला, व त्यात रस्ता निर्माण करण्याचे काम सुरू केले. तसेच पूर्वी खाड़ी किनारी असलेली पूर्ण वाढ झालेली जवळपास 22 झाडे बेकायदेशीरपणे काढून ती खाड़ीपात्रात अक्षरशः फेकण्यात आली.

या सर्व प्रकाराबाबत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी समाजमाध्यमातून वाचा फोडली व हा प्रकार महापालिका बांधकाम विभाग व आयुक्तांच्या नजरेस आणून दिला व तातडीने कारवाईची मागणी केली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने काम थांबवण्याची लेखी नोटिस बांधकाम विभागामार्फत देण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खाडीमध्ये अतिक्रमण व भराव तसेच परवानगीचे उल्लंघन होत असताना महापालिका बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच महसूल प्रशासन नक्की काय करत होते? असा प्रश्न मनोज पाटील यांनी उपस्थित केला.
यावर्षी बोळींज खारोडी ते जकात नाका रस्ता अनेक दिवस पाण्याखाली गेला होता. वसई विरारमधील हा एकमेव रस्ता पाण्याखाली होता याचे प्रमुख कारण हे खाड़ीमधील भराव हे होते. त्यामुळे या सर्व प्रकरणात खाड़ी पात्रातील भिंत तसेच भराव तातडीने काढून टाकण्यात यावा तसेच दोषी ठेकेदार बिल्डर व महापालिका बांधकाम विभागातील अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई करावी व दिलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

First Published on: August 30, 2022 8:48 PM
Exit mobile version