जलतरणपटू शुभम वनमाळीचे बोर्डी ते डहाणू स्विम पूर्ण

जलतरणपटू शुभम वनमाळीचे बोर्डी ते डहाणू स्विम पूर्ण

डहाणू : डहाणू तालुक्यातील कासा येथील कर्मभूमी असलेला व सध्या नेरूळ मध्ये वास्तव्यास असलेला, शुभम वनमाळी ह्याने 14 नोव्हेंबर रोजी समुद्रातून बोर्डी ते डहाणूपर्यंत पोहून पार केले आहे. याआधी देखील शुभमने मुंबई ते डहाणूपर्यंत पोहून मोठा रेकॉर्ड नोंदवला आहे. त्यावेळेस मिळालेल्या सहकार्य आणि सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व अध्ययन अक्षमतेच्या जनजागृतीसाठी शुभमने बोर्डी ते डहाणू पोहून पार केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
शिवछत्रपती अ‍ॅवॉर्ड विजेता आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू, असणार्‍या शुभम वनमाळी याने बोर्डी बीच ते डहाणू बीच हे २३ किलोमीटर अंतर मात्र, 7 तास 18 मिनिटात पोहून पूर्ण केले आहे. बोर्डीवरून सकाळी 7.30 वाजता निघालेला शुभम डहाणू बीच येथे 1.00 वाजता पोहचला आहे. बोर्डी ते डहाणू या स्विमचे वैशिष्ट असे आहे की, गत वर्षी च्या डिसेंबर महिन्यात त्याने गेटवे ऑफ इंडिया ते डहाणू बिच हे १४७ किलोमीटर अंतर पार केले होते. या मोहिमेत डहाणू व परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी जलतरणाच्या माध्यमातून हे स्विम केले आहे. या स्वीमला सुद्धा मागच्या सारखाच मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

येत्या महिनाभरात शुभम गोवा ते मुंबई असा ४१३ किलोमीटरचा सागरी प्रवास ११ ते १५ दिवसात पोहून पार करण्याचा शुभमचा मानस आहे. परंतु प्रायोजक, देणगीदार मिळत नसल्याने हा कार्यक्रम थोडा पुढे जाऊ शकतो अशी माहिती त्याच्या कुटुंबियांकडून मिळत आहे. शुभमच्या ह्या विक्रमासाठी त्याचा सत्कार करण्याचा कार्यक्रम डहाणू पोंदा हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डहाणूचे तहसीलदार अभिजित देशमुख, डहाणू पोलीस ठाण्याचे प्रभारी नामदेव बडगर, नवनिर्वाचित डहाणू पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, पोंदा शाळेचे विश्वस्त व शिक्षक सोबत शुभमला नेहमीच सहकार्य करणारे शिव शक्ती मित्रमंडळ कासा व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

First Published on: November 14, 2022 9:32 PM
Exit mobile version