तलासरी पाठोपाठ डहाणूतही नदीतून अंत्ययात्रा

तलासरी पाठोपाठ डहाणूतही नदीतून अंत्ययात्रा

डहाणू : डहाणू तालुक्यातील रायपूर गावात देखील तलासरीतील बोरमाळ प्रमाणेच नदीतून अंत्ययात्रा न्यावी लागत असल्याची घटना समोर आली आहे. सोमवार 22 ऑगस्ट रोजी गंगीबाई पिल्या गवळी वय 90 या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यांची प्रेतयात्रा नदीपात्रातून घेऊन जावी लागली आहे. तर, प्रसंगी आजारी व्यक्तींना देखील दवाखान्यात नेण्यासाठी नदीपात्रातून मार्ग काढावा लागत असल्याची माहिती रायपूर ग्रुपग्रामपंचायतचे सदस्य महेंद्र गवळी यांनी दिली आहे.
डहाणू तालुक्यातील गंभीर गडाच्या पायथ्याशी वसलेल्या रायपूर गावातील नागरिकांना स्मशानभूमी गाठण्यासाठी गावातून वाहणार्‍या डोंगर खाडी नदीचे पात्र ओलांडून दुसर्‍या बाजूला जावे लागत आहे. मात्र नदीवर पूल नसल्यामुळे नागरिकांना नदीपात्रातूनच पुढे जावे लागत असल्याचे विदारक दृश्य आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी पाठपुरावा करून देखील उपाययोजना करण्यात येत नसल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.

डहाणू तालुक्यातील आष्टा-रायपूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या आष्टा येथील कण्हेरी डोंगरातून उगम पावणारी डोंगरखाडी नदी रायपूर गावाच्या मधून वाहते. नदीच्या पलीकडे गवळीपाडा, माढापाडा, कालात पाडा आणि कातकरी वस्ती आहे. रायपूर गावात दोन्ही बाजूला नदीपर्यंत रस्ता आहे. मात्र, नदीवर पूल नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात नदी पलीकडे गवळीपाडा परिसरात मृत्यू झाल्यास मयतावर अंत्यविधी पार पाडण्यासाठी नागरिकांना नदीपात्र ओलांडून यावे लागते, त्यातल्यात्यात गावात स्मशानभूमी शेड नसल्यामुळे उघड्यावरच अंत्यविधी पार पाडवा लागत असल्याचे विदारक चित्र आहे. सोबतच गवळीपाडा परिसरातील पाड्यांमध्ये साधारण 900 च्या आसपास लोकवस्ती असताना देखील नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी चिखलमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रायपूर गावासाठी देखील योग्य त्या उपाययोजना करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. राज्यशासनाकडून आदिवासी नागरिकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात मात्र प्रत्यक्षात या उपाययोजना तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचताना दिसत नाहीत. तळागाळातील गोरगरीब आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

First Published on: August 24, 2022 10:25 PM
Exit mobile version