तालुक्यातील भूकंपाचा करंट प्रशासनाने ओळखण्याची गरज

तालुक्यातील भूकंपाचा करंट प्रशासनाने ओळखण्याची गरज

कुणाल लाडे,डहाणू : डहाणू तालुक्यातील कासा चारोटी परिसरात 21 व 23 जानेवारी रोजी भूकंपाचे तीन धक्के बसले आहेत. मात्र या संदर्भातील नोंदी संकेतस्थळावर किंवा शासकीय पातळीवर उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एकंदर आपत्कालीन परिस्थितीच्या पाश्वर्भूमीवर प्रशासनाच्या तयारी बाबत शंका उपस्थित केली जात आहे.कासा चारोटी परिसरात जानेवारीच्या 21 तारखेला मध्यरात्री 1 व 1.25 वा. दरम्यान दोन व 23 तारखेला 1 ते 1.30 वा दरम्यान एक भूकंपाचा धक्का जाणवला. या भुकंपाच्या हादर्‍यामुळे परिसरातील घरातील भांडी पडणे तसेच झोपेत असलेले नागरिक खडबडून जागे झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. असे असताना या संदर्भात तालुका व जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केली असता भूकंपाच्या धक्क्यांची नोंद किंवा त्याबाबतचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.

पालघरमधील डहाणू आणि तलासरी तालुक्यात 2018 पासून भूकंप सत्र सुरू आहे. प्रामुख्याने धुंदलवाडी, दापचरी, आंबेसरी, आंबोली, चारोटी, कासा, गंजाड, आशागड, घोलवड सह इतर काही भागात आतापर्यंत दोन ते साडेचार रीस्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाच्या या धक्क्यामुळे बाधीत क्षेत्रातील शेकडो घरांना तडे जाऊन घरांचे नुकसान झाले आहे. सुरुवातीला प्रशासनाने सर्वाधिक प्रभावित परिसरातील नागरिकांना शाळा, अंगणवाडी सारख्या मोकळ्या परिसरात कापडी तंबूमध्ये राहण्याची सोय करून दिली होती. मात्र आता पुन्हा भूकंपाचे सुरू झाले असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

 

कोट –
शनिवारी आणि सोमवारी मध्यरात्री भूकंपाच्या बसलेल्या धक्क्यामुळे पूर्ण घर हादरले होते. अचानक बसलेल्या धक्क्यांमुळे मध्यंतरी कमी झालेल्या भूकंप सत्राला पुन्हा सुरुवात झाल्याची प्रचिती आली. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांची तयारी ठेवण्याची आवश्यकता भासत आहे.
– विष्णू रावते, ग्रामस्थ आवंढाणी

First Published on: January 23, 2023 10:22 PM
Exit mobile version