त्या’ जोडप्यांना मिळाला ’जीवदानी’चा हात

त्या’ जोडप्यांना मिळाला ’जीवदानी’चा हात

मनोरः आदिवासीबहुल भाग असलेल्या पालघर जिल्ह्यातील गरीब आणि आदिवासी मुलामुलींचा सामुदायिक विवाह सोहळा बोईसर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यादरम्यान तब्बल २५० जोडप्यांनी लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास अशा या जोडप्यांना त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर , आमदार राजेश पाटील उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील बहुतांश भाग आदिवासीबहुल असून येथील बहुतांश लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अनेक कुटुंबांना लग्नाचा खर्च परवडत नाही. अशा कुटुंबांसाठी श्री जीवदानी देवी संस्थान, जय आदिवासी युवा शक्ती आणि सर्वदा प्रतिष्ठान यांनी एकत्र येत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाह सोहळ्यात तब्बल २५० जोडप्यांनी सहभाग नोंदवत लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात झालेल्या या सोहळ्यात वधुला मंगळसूत्र, वधू-वरांना पोशाख आणि संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या. विशेष म्हणजे त्यांची शाही मिरवणूक काढत उपस्थितांना पंचपक्वान्नाचे भोजन देण्यात आले. या वेळी वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर ,आमदार राजेश पाटील उपस्थित होते.

आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली नाही, म्हणून या जोडप्यांना लग्नसोहळ्याच्या आनंदापासून वंचित राहावे लागले असते. त्यामुळे श्री जीवदानी देवी मंदिर संस्थानाने पुढाकार घेत हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला. अगदी मिरवणूकही वाजतगाजत निघाली. अशा प्रकारचे सोहळे मोठ्या प्रमाणात आयोजित करायला हवेत. तसेच अधिकाधिक संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना ते इतरांपेक्षा कमी आहेत, याची जाणीवही होता कामा नये.
—आमदार क्षितीज ठाकूर

First Published on: February 27, 2024 10:17 PM
Exit mobile version