मुंबईहून गुजरातकडे जाणारा नवा वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला

मुंबईहून गुजरातकडे जाणारा नवा वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला

विरार:  गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या वर्सोवा खाडीवर गुजरातकडे जाणारा पूल सोमवारी संध्याकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुंबई- अहमदाबाद हायवेवरील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या नव्या उड्डाणपुलाचे लोकार्पण आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले. खाडीवर असलेल्या या वर्सोवा पुलावरून मुंबई- अहमदाबाद महामार्गाकडे वाहतूक चालते. त्यामुळे हा नवीन उड्डाणपूल खूप महत्त्वाचा आहे. गेली ४ वर्षे त्याचे काम सुरू होते. गेल्या १५ दिवसापासून उड्डाणपूल उद्घाटनासाठी सज्ज होता. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तपासण्या , निरीक्षण पूर्ण करण्यात आले. या उड्डाणपुलाची गुजरातकडे जाणारी एक मार्गिका आणि ठाण्याकडे जाणारी मार्गिका याचे लोकार्पण सायंकाळी आमदार सरनाईक यांच्या हस्ते नारळ फोडून आणि हिरवा लाईट दाखवून करण्यात आले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट करून सूचना दिल्या होत्या. उड्डाणपुलाचे काही काम होणे बाकी असून ते मेपर्यंत पूर्ण होणार आहे. पण, पूर्ण झालेली मार्गिका उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे रात्री वर्सोवा घोडबंदर उड्डाणपूल वाहनांसाठी खुला करण्यात आला. मुंबई-अहमदाबाद हायवेवरील दोन उड्डाणपुलांपैकी एक उड्डाणपूल कमकुमत झाला आहे. वाहतुकीचा प्रचंड बोजा असल्याने दोन्ही उड्डाणपूलावर ताण पडून घोडबंदर परिसरात कायम वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यासाठी नवा उड्डाणपूल बांधण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून हाती घेण्यात आले होते. पण, कायम रखडून पडल्याने सध्या फक्त गुजरातकडे जाणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.

First Published on: March 28, 2023 9:42 PM
Exit mobile version