वर्दीतील पोलीसच निघाला आरोपी

वर्दीतील पोलीसच निघाला आरोपी

भाईंदर: केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये बंद केलेल्या 1 कोटी रुपयांच्या नोटांच्या बदल्यात बारा लाख आणि सोने देण्याचे आमिष दाखवून नोटा घेऊन आलेल्याला पोलिसांची रेड पडल्याचे दाखवत लुटणार्‍या ठाणे शहर गुन्हे शाखेच्या एका कर्मचार्‍यासह तीन जणांना काशिमीरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईतील कुर्ला येथे राहणारे मनीष पाथाडे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांकडे केंद्र सरकारने चलनातून बाद केलेल्या एक कोटी रुपयांचा नोटा होत्या. त्याबदलून देतो असे सांगून पोलिसांच्या खबर्‍या असलेल्या राकेश उपाध्याय उर्फ पंड्या (४५, रा. रा. हवा महल, मानपाडा, ठाणे) याने काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोडबंदर येथील फाउंटन हॉटेल परिसरात सोमवारी रात्री बोलावून घेतले होते. पाथाडे एक कोटी रुपयांच्या नोटा घेऊन फाऊटन हॉटेल परिसरात आले असता अचानक पोलिसांची पाटी असलेली एक कारने त्यांची गाडी अडवली. पोलिसांची रेड असल्याचे सांगत पोलीस ड्रेसमध्ये असलेल्या इसमाने पाथाडे यांना गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर पाथाडे यांची गाडी घेऊन पोलीस आपल्या सहकार्‍यासह निघून गेला. त्यावेळी पाथाडे यांच्या गाडीत बाद झालेल्या एक कोटी रुपयांच्या नोटांसह एक लाख रुपये रोख रक्कमही होती.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाथाडे यांनी थेट काशिमीरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी तपासाची चक्रे वेगाने हलवली. काशिमीरा पोलिसांनी त्याच रात्री याप्रकरणातील तीन जणांना अटक केली. त्यावेळी पोलिसांनाच धक्का बसला. पोलिसांची बतावणी करणारा विकास विक्रांत लोहार (४४, रा. जुनी पोलीस लाईन, कोर्ट नाका, ठाणे) हा खराखुरा पोलीस निघाला. तो ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकमध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहे. तर यातील मास्टरमाईंड राकेश उपाध्याय उर्फ पंड्या हाही पोलिसांच्या हाती लागला. राकेश विकास लोहार यांचा खबर्‍या म्हणून काम करत असून त्याचे एक युट्यूब चॅनेलही असल्याचे उजेडात आले आहे. त्याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल असल्याचेही तपासात दिसून आले आहे. तर तिसरा आरोपी स्वप्निल रसाळ (४३, रा. स्नेहदिशा, परबवाडी, ठाणे) हा या गँगचा सभासद असल्याचे निष्पन्न झाले आहे. याकारवाईत पोलिसांनी चोरून नेलेली पाथाडे यांची गाडी आणि 1 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी आणि बाद झालेल्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आरोपींना ठाणे कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे.

First Published on: September 13, 2022 9:52 PM
Exit mobile version