नालासोपारा पूर्वेकडील आचोळ्यात उघड्या गटाराची समस्या

नालासोपारा पूर्वेकडील आचोळ्यात उघड्या गटाराची समस्या

नालासोपारा पूर्वेकडील आचोळा गावातील सिद्धीविनायक वेल्फेअर सोसायटी येथील महापालिकेने उघड्या गटाराची स्वच्छता न केल्याने गटाराचे पाणी रस्त्यावर आले आहे. तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. आचोळे डोंगरी येथे सिद्धीविनायक वेल्फेअर सोसायटी आहे. या सोसायटी परिसरात तब्बल पाचशे ते सहाशे कुटुंबियांचे वास्तव्य असून उघड्या गटारांमुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उघड्या गटारांमुळे या भागात डासांची समस्या वाढली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असून मलेरिया डेंग्यू यासारख्या आजारांचे रुग्ण देखील या परिसरात आढळून आले आहेत. उघड्या गटाराचे पाणी सतत वाहत असल्याने रस्त्याने ये-जा करणे देखील अवघड झाले आहे.

या परिसरात मागील २५ वर्षांपासून माझे वास्तव्य आहे. महापालिकेने अद्याप नीटनेटके गटार बनवले नसल्याने आज आम्ही अनेक समस्यांचा सामना करत आहोत. पावसाळ्यामध्ये डासांचे प्रमाण वाढून विविध आजारांचे शिकार होत आहोत.
– दिलीप पवार, स्थानिक रहिवासी

पावसाळ्यात शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी शहरातील छोट्या-मोठ्या वस्तीमधील गटारांची स्वच्छता होणे गरजेचे आहे. मात्र तरीदेखील पालिकेकडून शहरातील छोट्या-मोठ्या भागांमध्ये गटारांची स्वच्छता करण्यात येत नसल्याने ऐन पावसाळ्यात या भागातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यंदाही पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचून साथीचे आजार पसरण्याचा मोठा धोका निर्माण झालेला असतो. महापालिकेने तातडीने या समस्येची दखल घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

हेही वाचा –

कुत्रा भुंकतोय, भुंकू दे; अकबरुद्दीन ओवेसींची राज ठाकरेंवर टीका

First Published on: May 12, 2022 9:28 PM
Exit mobile version