तारापूरच्या बंद कारखान्यामधील स्फोटामागे निघतोय संशयाचा धूर

तारापूरच्या बंद कारखान्यामधील स्फोटामागे निघतोय संशयाचा धूर

बोईसर: तारापूर औद्योगिक वसाहतीमधील औरा ऑईल या बंद कारखान्यात झालेल्या स्फोटामागे संशयाचा धूर निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तीन व्यक्तींची चौकशी सुरू असून अजूनपर्यंत कोणताही गुन्हा नोंद केलेला नाही.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्र.एन-२२ वरील औरा ऑईल या मागील सहा वर्षांपासून बंद कारखान्यात शनिवारी दुपारी भंगार चोरीच्या उद्देशाने आत शिरलेले चोर कटरच्या सहाय्याने यंत्रसामग्रीचे तुकडे करीत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. तर स्फोट होऊन आग भडकताच चार ते पाच चोर आणि क्रेन चालक यांनी कारखान्यातून पळ काढला होता. स्फोट आणि आगीची खबर मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर अग्निशमन दल यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले तर अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासानंतर आग आटोक्यात आणली. याप्रकरणी बोईसर पोलीस स्टेशन येथे अकस्मात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली असून तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.

कंपनी मालकाला कामगारांचा पगार आणि देणी चुकवता न आल्याने तसेच कर्जाचे हफ्ते चुकल्याने औरा ऑईल हा साबणाचे उत्पादन करणारा कारखाना २०१६ सालापासून बंद अवस्थेत असून बँकेकडे गहाण आहे. कारखाना बंद होते वेळी यामध्ये ४५ कायमस्वरूपी तर २५ कामगार हे कंत्राटी स्वरुपात काम करत होते. त्यांचे ६ महिन्यांचे वेतन कारखान्याने थकवले असून ४० महिन्यांचा भविष्य निर्वाह निधी सुद्धा भरला नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्याचप्रमाणे या कारखान्याने पालघर महसूल विभागाची जमीन महसुलाची जवळपास ३.५० लाखाची थकबाकी सुद्धा थकवली आहे. कारखाना बंद झाल्यानंतर आतापर्यंत आतील ८० टक्के यंत्रसामग्री भंगार चोरांनी चोरून नेली असून यापूर्वी देखील चोरी करताना दोन ते तीन वेळा या कारखान्यात आगीच्या घटना घडल्या आहे. गेल्या दोन वर्षात कंपनीमधील महागड्या डाय आणि मोठ्या क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटर आणि अन्य सामान चोरीला गेले आहे.

कंपनीमध्ये यंत्र सामग्री आणि लोखंडी टाक्या मिळून सुमारे 1 कोटी रुपयांचा माल शिल्लक असून मालकाने कंपनीमधील भंगाराची विक्री करून कामगारांची देणी अदा केली पाहिजेत. परंतु कंपनी मालक छुप्या पध्दतीने गुंड प्रवृत्तीचे लोक आणि भंगार माफियांना हाताशी धरून भंगार चोरीचा डाव सुरू असल्याचा आरोप करत कामगारांच्या पोटावर लाथ मारून कंपनीमधील भंगार चोरीत सहभागी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कामगारांकडून करण्यात आली आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद पडलेल्या कारखान्यातील यंत्रसामग्री, केमिकलच्या टाक्या, ड्रम आणि इतर भंगार चोरण्यासाठी चार ते पाच मोठ्या टोळ्या कार्यरत आहेत. मुख्यत:रात्रीच्या अंधारात हे चोरीचे भंगार बाहेर काढून बोईसरच्या अवधनगर भागातील सरकारी जागांवर उभ्या अनधिकृत भंगार गोदामांमध्ये याची विभागणी केली जाते व पुढे मुंबईतील कुर्ला आणि भिवंडी येथील मोठ्या भंगार बाजारात रवाना केले जाते. या भंगार चोरीच्या व्यवसायातून महिन्याकाठी करोडो रूपयांची उलाढाल केली जाते.त्यामुळे हे भंगार मिळविण्यासाठी अनेक गुन्हेगारी टोळ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

सहा वर्षांपासून कामगारांच्या थकीत वेतनाची रक्कम मिळावी यासाठी लढाई सुरू असून गेल्या काही महिन्यापासून दिवसा ढवळ्या कंपनीतील यंत्र सामग्री व इतर लोखंडी वस्तू भंगार चोर राजरोस चोरी करत आहेत. आमच्या हक्काच्या पैशांसाठी आमचा लढा सुरू असून कंपनीतील भंगाराची चोरी करणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे.
– गणपत पाटील, कामगार, ओरा ऑइल कंपनी

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद कंपन्यांमधील भंगार यंत्र सामग्रीची चोरी आणि अवैधरित्या घातक केमिकल मुरबे खाडी तसेच शेतजमिनीमध्ये सोडले जात असल्याच्या तक्रारी पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केल्यानंतरही कारवाई होत नाही. सतत होत असलेल्या चोर्‍यांमध्ये स्थानिक आणि परप्रांतीय भंगारमाफियांचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. कालच्या स्फोटामुळे चोरीची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे आता तरी कारवाई झाली पाहिजे.
– रुपेश संखे, माजी उपसरपंच आणि अध्यक्ष
पर्यावरण उत्कर्ष संस्था.

अकस्मात आगीची नोंद करून तिघांना ताब्यात घेण्यात आले असून एक क्रेन ताब्यात घेतली आहे. स्फोट व आगीच्या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
– प्रदीप कसबे, पोलीस निरीक्षक, बोईसर.

First Published on: October 31, 2022 9:24 PM
Exit mobile version