स्व. लता मंगेशकर नाट्यगृहातील पहिलाच प्रयोग रद्द

स्व. लता मंगेशकर नाट्यगृहातील पहिलाच प्रयोग रद्द

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरात नुकत्याच उद्घाटन झालेल्या स्व. लता मंगेशकर नाट्यगृहातील पहिलाच प्रयोग ध्वनीक्षेपक यंत्रणा व प्रकाशयोजनेतील समस्या यामुळे रद्द करण्यात आला आहे. नाट्यगृहात अभिनेते गिरीश ओक यांचा रविवारी १३ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला ३८ कृष्ण व्हिला या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. रविवारी ३८ कृष्ण व्हिला’ या नाटकाचा नाट्यगृहाचा पहिला प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र दिवस आधी नाटक व्यवस्थापकांनी नाट्यगृहाची पाहणी केली असता नाट्यगृहातील ध्वनीक्षेपक यंत्रणातील बिघाड आणि आवश्यक असलेल्या प्रकाशाची सुविधा सुरळीत नसल्याचे आढळले. त्यामुळे नाटक रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यापूर्वी देखील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज व मराठा समाज भवन भूमिपूजन कार्यक्रमात ध्वनीक्षेपक यंत्रातील बिघाडीची असल्याने त्यात आवाजाची बाब समोर आली होती. मात्र या तक्रारीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे नाट्यगृहातील पहिला व्यावसायिक प्रयोग रद्द करण्याची वेळ आल्याने नाट्यप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. नाट्यगृहात तांत्रिक बिघाड असल्यामुळे आम्ही नाटक रद्द करत असल्याचे नाटक व्यवस्थापकांनी कळवले आहे.

नाट्यगृहाचे संपूर्ण बांधकाम हे १ लाख १० हजार फुटांचे आहे. त्यात एक मोठे नाट्यगृह असून त्यात १ हजार सीट्स आहेत. तर छोट्या नाट्यगृहात ३०० सीट्स आहेत. तिसर्‍या व चौथ्या मजल्यावर आर्ट गॅलरी तयार करण्यात आली आहे. बेसमेंटमध्ये व तळमजल्यावर पार्किंगची सुविधा तयार करण्यात आली आहे. आर्ट गॅलरी, वेटिंग हॉल, कॅफेटेरिया , व्हीआयपी रूम, ग्रीन रम अशा सुविधा असून ६ लिफ्ट नाट्यगृहात आहेत. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या नाट्यगृहात बसण्याची आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. या नाट्यगृहाची ध्वनी यंत्रणा म्हणजेच साउंड सिस्टीम आधुनिक पद्धतीची असून मुंबईतील मोठ्या कंपनीने साउंड सिस्टीम, विद्युतीकरण, प्रकाश व्यवस्था येथे केली आहे. मात्र ती पुरेशी चालत नाही आहे, त्यामुळेच कलाकारांनी पहिलाच प्रयोग रद्द केल्यानेच नाट्यप्रेमी रसिकांना निराशेला सामोरे जावे लागले आहे.

नाट्यगृहाची निर्मिती करत असताना त्या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीकडून सल्ला घेणे फार महत्वाचे आहे. आम्ही तांत्रिक बाबींमधील समस्यांमुळे प्रयोग रद्द करीत आहोत.
– गिरीश ओक, अभिनेते –

 

नाटक व्यवस्थापकांनी परस्पर नाटक रद्द करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक ते बदल करून येत्या काही दिवसांत नाटकाचा हा प्रयोग घेतला जाईल.

– रवी पवार, उपायुक्त, मीरा -भाईंदर महानगरपालिका

 

First Published on: November 13, 2022 9:05 PM
Exit mobile version