तेरा महिन्यांनंतर खुनाचा पर्दापाश;आरोपींना बेड्या

तेरा महिन्यांनंतर खुनाचा पर्दापाश;आरोपींना बेड्या

वसई : वसईतील एका विवाहितेची बकरी ईदच्या दिवशी नवरा आणि तिच्या सासर्‍याने गळा कापून हत्या केली. इतकेच नाही तर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तिचे डोके धडापासून वेगळे केले. त्यानंतर मुंडके एकीकडे तर धड नसलेला मृतदेह बॅगेत भरून दुसरीकडे फेकून दिला होता. तेरा महिन्यांपूर्वी वसईत काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली होती. त्याचा खुलासा आता झाला आहे. 27 जुलै 2021 रोजी वसईच्या भुईगाव समुद्रकिनार्‍यावर एका सुटकेसमध्ये पोलिसांना मुडके नसलेला महिलेचा मृतदेह आढळला होता. 29 ऑगस्ट 2022 रोजी आचोळे पोलीस ठाण्यात सानिया शेख (25) ही महिला बेपत्ता असल्याची तक्रारी सानियाच्या कुटुंबियांनी दिली होती. तिचे पालक बेळगाववरून मुलीचा शोध घेत आले होते. त्यामुळे सुटकेसमधील मृतदेह सानियाचा असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी मृतदेहाच्या डीएनचे नुमने आणि मयत सानियाच्या 3 वर्षांच्या मुलीचे डीएनए तपासणीसाठी पाठवले असता हा मृतदेह सानिया हिचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वसई पोलिसांनी सानियाचा पती आसिफ शेख (32) याला मुंब्राहून अटक केली. तेरा महिन्यांपूर्वी अतिशय थंड डोक्याने नवरा आणि सासर्‍याने सानिया शेख (25) हिची अतिशय निदर्यपणे हत्या केली होती. यानराधमांनी त्यासाठी बकरी ईदचा दिवस निवडला होता.

नालासोपारा येथील रश्मी रेसिडेन्सी येथे आसिफ शेख (32) त्याची पत्नी सानिया (28) आणि कुटुंबियांसोबत रहात होता. दोघांमध्ये क्षुल्लक कारणांवरूनही वाद होत असत. आसिफचा सानियाच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातूनच आसिफने 27 जुलै 21 च्या रात्री तिची हत्या केली. सानियाचे मुंडके धडावेगळे करून तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून आसिफने तो भुईगाव खाडीत फेकून दिला होता. सानियाची हत्या संपूर्ण शेख कुटुंबाने अगदी निर्दयीपणे केल्याचे उघड झाले आहे. गळा कापून सानियाचं मुंडके शरीरापासून वेगळे केले. धक्कादायक बाब म्हणजे त्यादिवशी बकरी ईदही होती. शेख कुटुंबाने तिला मारण्याचा कट रचला होता. आसिफने तिला मारहाण करत बेडरुममध्ये नेऊन तिचे हातपाय बांधले. गळा आवळून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण सानियाचा जीव जात नव्हता. म्हणूनच सानियाचे तोंड पाण्याने भरलेल्या बादलीत तब्बल पंधरा मिनिटे दाबून धरण्यात आले. सायिनाचा मृत्यू झाल्यानंतर हत्येचा कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी आसिफ आणि त्याचा बाप हनिफ शेख या दोघांनी अतिशय अमानुष, निर्दयीपणे एका धारदार सुर्‍याने तिचे मुंडके धडावेगळे केले. त्यानंतर ट्रिमरने तिच्या डोक्यावरील केस काढण्यात आले. सानियाच्या ओठांवर असलेला काळ्या रंगाचा मोठा तीळ चाकूच्या साह्याने कापून टाकला.

संपूर्ण कुटुंबच सहभागी
एका पिशवीत सानियाचे धडावेगळे डोके घालून आसिफ आणि त्याचा भाऊ याशिन शेख यांनी दुचाकीवरून मुंबई-अहमदाबाद हायवेवरील खानिवडे पूलावरून ते खाडीत फेकून दिले. त्याचरात्री सानियाचा मुंडके नसलेला मृतदेह चादरीत गुंडाळून एका बॅगेत भरण्यात आला. मेव्हणा युसुफ शेख याच्या गाडीतून ती बॅग भुईगावच्या खाडीत फेकून दिली. याप्रकरणी पोलिसांनी सानियाचा नवरा आसिफ शेख, सासरा हनिफ शेख, दीर याशिन शेख आणि मेव्हणा युसुफ शेख याला अटक केली आहे.

First Published on: September 20, 2022 10:09 PM
Exit mobile version