काटेरी झुडुपांची तोरणे देतात पोटाला गोडवा

काटेरी झुडुपांची तोरणे देतात पोटाला गोडवा

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या ग्रामीण भागातील जंगली पट्ट्यात तोरणाची काटेरी झुडूपे मोठ्या प्रमाणावर असून या काटेरी झुडपांना लागलेल्या तोरणाच्या फळ विक्रीतून सध्या आदिवासी मुलांसह महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. तोरणाचे काटेरी झुडूप रस्त्याच्या कडेला, डोंगर कपारीला वाढलेले दिसते. काही भागात या काटेरी झुडपांचा शेतीच्या भोवती तसेच परसबागेला कुंपण बनविण्यासाठी देखील वापर केला जातो.साधारणत: एप्रिल मे महिन्यात स्थानिक लोक गावच्या बाजारात, तोरगंण घाटात, रस्त्याच्या कडेला पानांच्या द्रोणामध्ये तोरणाची पिकलेली गोड मधुर अशी लहान लहान फळे विकायला घेऊन बसतात.एक द्रोण वीस रुपयांपर्यंत विकतात. तोरणाचे फळ खायला गोड मधुर असल्याने मोखाड्याहून नाशिकच्या दिशेने प्रवास करणारे चाकरमानी मोठ्या आवडीने तोरणाचे द्रोण खरेदी करतात. त्यामुळे वर्षातील एप्रिल मे महिन्यात रानमेवा विक्रीतून आदिवासी नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत आहे.

तोरण वनस्पतीची ओळख
तोरणाची काटेरी झुडूपे साधारण: ९ ते १० मीटरपर्यंत उंच वाढतात.तांबुस, कोवळ्या फांद्यांना एकेरी किंवा दुहेरी काटे असतात.काटे काहीसे मागे वाकलेले असून या काटेरी फांद्यांवर लंबगोलाकार साधारण १ सें.मी लांब फळ लागते.सुरूवातीला ही फळे कच्ची असताना लालसर हिरवी दिसतात तर पिकल्यावर पांढरी होतात.हा पांढरा गर खाण्यासाठी मधुर लागतो.तर फळांच्या आतमध्ये एक लहान बी असते या फळा प्रमाणे बिया देखील भाजून खाल्ल्या जातात.

First Published on: May 15, 2023 10:13 PM
Exit mobile version