Ticket Checker Bitten: महिला प्रवाशाकडून तिकिट तपासनिसाचा चावा

Ticket Checker Bitten: महिला प्रवाशाकडून तिकिट तपासनिसाचा चावा

वसई : महिला तिकिट तपासनिसाबरोबर झालेल्या वादातून एका महिला प्रवाशाने चक्क तिकिट तपासनिसाच्या हाताचा जोरात चावा घेतला आहे. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी 32 वर्षीय महिला प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अथीरा सुरेंद्रनाथ केपी (26) या महिला तिकीट तपासनीस गुरुवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे लोकल ट्रेन मध्ये तिकिट तपासण्याचे काम करत होता. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्या बोरीवली रेल्वे स्थानकातून विरार स्लो ट्रेनमध्ये चढल्या आणि प्रवाशांचे तिकिट तपासू लागल्या. यावेळी आरती सुखदेव सिंग (32) ही महिला प्रवाशी विना तिकीट प्रवास करत असल्याचे आढळले. अथीरा यांनी तिला 300 रुपये दंड भरण्यास सांगितले.

त्यावेळी आरती सिंगने अथीरा यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर दोघांमधील वाद वाढला. त्यामुळे अथीरा यांनी आरती सिंगला पुढील कारवाईसाठी वसई स्थानकात उतरण्यास सांगितले. मात्र वसई स्थानक येताच आरती सिंगने संधी पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ती धावू लागल्यावर अथीरा यांनी तिचा पाठलाग केला आणि तिला पकडले. यावेळी आरती सिंगने अथीरा यांच्या हाताचा जोरात चावा घेतला. जखमी झालेल्या अथीरा यांनी मदतीसाठी पोलिसांना बोलावले. फलाट क्रमांक दोनवरील गस्ती कर्मचार्‍यांनी आरती सिंगचा पाठलाग करून तिला पकडले.

First Published on: April 12, 2024 10:25 PM
Exit mobile version