पालिकेच्या ‘हँडवॉश स्टेशन’चा वापर उस रस विक्रीसाठी

पालिकेच्या ‘हँडवॉश स्टेशन’चा वापर उस रस विक्रीसाठी

वसई :  कोविडच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिकेने वसई-विरार शहरात तब्बल ५० लाख रुपये खर्चून बनवलेल्या ’हँडवॉश स्टेशन’वरील खर्च पाण्यात गेला आहे. मागील दोन वर्षांत देखभाल व दुरुस्तीअभावी या ’हँडवॉश स्टेशन’चा आसरा वसई-विरारमधील भिकारी आणि गर्दुल्ले आणि फेरीवालेच घेत असल्याचे दिसून येत आहे. आता तर नालासोपार्‍यात एका फेरीवाल्याने चक्क उसाचा रस विक्रीचेच दुकान महापालिकेच्या नाकावर टिच्चून टाकले आहे. त्यामुळे वसई-विरारमधील नागरिकांनी पालिकेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

२५ मार्च २०२० रोजी गंगाधरन डी. यांची वसई-विरार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती. दरम्यानच्याच काळात कोविड-१९चा संक्रमण काळ सुरू झाल्याने तत्कालीन आयुक्त गंगाधरन यांनी स्वच्छतेचा भाग म्हणून शहरात ’हँडवॉश सेंटर’ बनवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार शहरात ५० हँडवॉश स्टेशन बनवण्यात येणार होती. मात्र आयुक्तांच्या या अवाजवी व आवश्यक खर्चावर सत्ताधारी पक्षाच्या महापौरांनी आक्षेप घेतला होता. हा निर्णय घेताना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना व जनतेला विश्वासात घेतले नसल्याची खंत माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी व्यक्त केली होती.

वसई-विरार शहरातील नागरिकांनीही गंगाधरन डी. यांच्या निर्णयावर त्यावेळी टीका केली होती. शहरातील व रेल्वे स्थानकांतील बहुतांश पाणपोईची अवस्था पाहता पालिकेची ही ’हँडवॉश स्टेशन’ किती कामी येतील? याबाबत वसई भाजप अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तसनिफ शेख यांनी शंका उपस्थित केली होती.
सहा हँडवॉश स्टेशन बनवून पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर सहा स्टेशनचे काम सुरू होते. मात्र, विरोध वाढल्यानंतर उर्वरीत हँडवॉश स्टेशन गरज पाहून बांधण्यात येतील, असे महापालिकेतून सांगण्यात आले होते. प्रत्येकी साडेतीन लाख रुपये इतक्या कमी खर्चात महापालिका ही ’हँडवॉश स्टेशन’ बांधत होती. इतक्या कमी खर्चात काम होत असल्याने नागरिकांकडून चांगला प्रतिसादही येत असल्याची सारवासारव त्यावेळी महापालिकेतून देण्यात आली होती.

कोविडनंतर याचा वापर पाणी पिण्यासाठी केला जाऊ शकतो. तसा तो करता यावा, यासाठी थेट पाण्याचे कनेक्शन त्यात देण्यात आले आहे. शिवाय याच्या स्वच्छता आणि मेंटेनन्स राखला जावा, यासाठी महापालिका अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि पाणीपुरवठा कर्मचारी यांना आदेश देणार असल्याचेही महापालिकेतून सांगण्यात आले होते. मात्र, महापालिकेने यातील एकाही कामाची पूर्तता केलेली नाही. विशेष म्हणजे त्यावेळी उद्घाटनाआधीच यातील एका ’हँडवॉश स्टेशन’चे नळ चोरीला गेल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आजही बहुतांश हँडवॉश सेंटरवरील नळ गायब आहेत. तर काही ठिकाणी पाणीच नसल्याचे सांगितले जात आहे. आता तर नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या हँडवॉशच्या जागी एका फेरीवाल्याने चक्क उसाचा रसाचे दुकान थाटले आहे.

First Published on: March 17, 2023 9:35 PM
Exit mobile version