Uttan News: घनकचरा प्रकल्पाला लागणार्‍या आगीचा आंब्यांवर परिणाम

Uttan News: घनकचरा प्रकल्पाला लागणार्‍या आगीचा आंब्यांवर परिणाम

भाईंदर : महापालिकेच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाला सातत्याने आग लागत आहे. या आगीच्या झळा या आंब्याच्या झाडांना बसून त्याचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. यात आंब्याचा मोठ्या प्रमाणात मोहर जळून गेल्याने सुमारे ७० टक्के इतके उत्पादन घटले आहे. भाईंदर पश्चिमेला येथील उत्तन परिसरात असलेल्या भूभागात अनेक वर्षांपासून आंब्याची लागवड केली जाते. कोकण किनारपट्टीवरील या आंब्याला उत्तनचा राजा अशी ओळख आहे.महत्वाचे बाब म्हणजे हा आंबा अत्यंत उशिरा मे महिन्याच्या अखेरीस येत असल्यामुळे या याची विशेष मागणी असते.मात्र यंदा पडलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच घनकचरा प्रकल्पातून पसरणार्‍या प्रदूषणामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

तसेच आजूबाजूला फळबागायत दारांनी लागवड करण्यात आलेल्या आंब्याच्या झाडांना त्याच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. या झळांमुळे आंब्यांच्या झाडांना आलेला मोहर सुद्धा जळून गेला आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात लागलेल्या अशाच आगीचा धूर पसरून उत्तनच्या बागेतील आंब्याचा मोहर जळून गेला होता. घनकचरा प्रकल्पातून पसरलेल्या प्रदूषणामुळे आंब्याच्या पिकाचे ७० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा बागायतदारांना ३० टक्केच आंब्याचे उत्पन्न मिळणार आहे.मात्र हा आंबा मे महिन्याच्या अंती पिकत असल्याने तसेच त्यावर प्रदूषणाचे सावट असल्याने मोठ्या व्यापार्‍यांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी हा आंबा घाऊक बाजारापासून वंचित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

First Published on: April 26, 2024 9:43 PM
Exit mobile version