Vasai-Virar Corporation: महामार्गावरील जलसंकट रोखण्यासाठी पालिका आक्रमक

Vasai-Virar Corporation: महामार्गावरील जलसंकट रोखण्यासाठी पालिका आक्रमक

वसईः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जलसंकट रोखण्यासाठी वसई- विरार महापालिका पथकाने महामार्गावर केलेल्या पाहणी दौर्‍यानंतर समोर आलेल्या समस्या दूर करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना कामांचे निर्देश दिले आहेत. एका महिन्यात कामे पूर्ण झाली पाहिजेत, असा अल्टीमेटमच आयुक्तांनी दिला आहे. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा प्रमुख महामार्ग असून त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा महामार्ग पावसाळ्यात पाण्याखाली जाऊ लागला आहे. महामार्ग जलमय झाल्याने तासनतास वाहतूक कोंडी होत असते. येत्या पावसाळ्यात ही समस्या उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी नुकतीच महामार्गाला भेट देऊन पाणी साचण्याच्या कारणांचा शोध घेतला होता. त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात महावितरण, महामार्ग प्राधिकरण, वनविभाग, रेल्वे, वाहतूक पोलीस आणि डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशेन (डीएफसीसीएल) आदी विभागाबरोबर संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होतेे.

या बैठकीत आयुक्तांनी विविध विभागांना कामांचे निर्देश दिले आहेत. महामार्गावरील पाणी साचून वाहतूक ठप्प होत असते. यासाठी महामार्गालगत असलेला राडारोडा साफ करणे, वासमारे पूल (रेल्वे क्रॉसिंग) जवळ असलेल्या दुभाजकामधील दगड, माती साफ करणे. सनशाईन हॉटेल, रेल्वे क्रॉसिंग, न्यू फाऊंटन सिटी आदी १४ प्रमुख ठिकाणी नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे. नैसर्गिक नाले साफ करणे, पाणी जाण्याचे मार्ग तयार करणे आदी कामांचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय महामार्गावर डि वॉटर पंपिगची व्यवस्था करणे, पाणी जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग (ड्रेन लाईन) तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. महामार्गालगत भूमीगत वीज वाहक तारा उघड्या असतील तर त्या संरक्षित करणे, आदी सूचना महावितरणाला देण्यात आल्या आहेत.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशनतर्फे अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यामुळे पाणी साचून दुर्घटना होऊ शकतात. त्यामुळे डीएफसीसीएलने कामे सुरू असलेल्या ठिकाणी योग्य त्या उपायोजना करण्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. डीएफसीसीएलने भराव काढण्याचे काम केले नाहीतर आपत्ती व्यव्यस्थापन कायद्या अंतर्गत अधिकार्‍यांवरवर गुन्हे दाखल करावेत, असे कडक निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले. महावितरणाच्या अनेक ठिकाणी वीज वाहक तारा या धोकादायक अवस्थेत आहेत. अशा तारा पडून दुर्घटना घडत असतात. त्यावर उपाय करण्याचे निर्देश महावितरणाला देण्यात आले आहेत. महापालिकेच्या हद्दीतील नालेसफाईचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. महामार्गावरील विविध समस्या सोडवण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांना देखील आयुक्तांनी कामांचे निर्देश दिले आहेत. सर्व विभागांच्या समन्वयाने ही कामे केली जातील असा विश्वास आयुक्त अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केला आहे.

०००

महामार्गावर आपातकालीन नियंत्रण कक्ष

महामार्गावरील १४ ठिकाणांवर उपाययोजना करण्याबरोबर संपूर्ण महामार्गावर पेट्रोलिंग वाहने, रुग्णवाहिका आणि क्रेन तयार ठेवली जाणार आहे. २४ तास कार्यरत राहणारा आपात्कालीन व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केला जाणार आहे.

०००

भूस्खलन आणि दरड दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना

महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर वनजमिनींवर अतिक्रमण झाले आहे. डोंगर पोखरून बांधकामे झाली आहेत. पावसाळ्यात दरड कोसळून दुर्घटना होत असतात. त्यासाठी वनखात्याच्या अंतर्गत असेलल्या नाल्यांची साफसफाई करणे, भूस्खलन होण्याची ठिकाणी शोधून तेथील रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे, अशा ठिकाणी अतिक्रमणे झाली असतील ते निष्काषित करावीत, असे निर्देश आयुक्तांनी वनविभागाला दिले आहेत.

०००

जलसंकटाचा सामना करण्यासाठी विशेष नियोजन

पावसाळ्यातील शहरातील जलसंकट आणि संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी आता महापालिकेने सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून रेल्वे, वनखाते, महामार्गप्राधिकरण, महावितरण आदी विभागांची बैठक घेऊन कामांचे निर्देश दिले आहेत. पुढील एका महिन्यात ही कामे करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात शहर जलमय होण्याबरोबरच भूस्खलन होणे, सखल भागात पाणी साचणे, विजेचा धक्का लागणे, दरड कोसळणे, वाहतूक व्यवस्था ठप्प होणे, महामार्गावर पाणी साचणे आदी विविध समस्या निर्माण होत असतात. यंदा ही समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने सर्व महत्वाच्या विभागांसमवेत समन्वय साधून उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा या कामांसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

First Published on: April 26, 2024 9:40 PM
Exit mobile version