वसई -विरार महापालिका मॅरेथॉन वादाच्या भोवर्‍यात

वसई -विरार महापालिका मॅरेथॉन वादाच्या भोवर्‍यात

वसई : कोरोनामुळे गेली दोन वर्षे होऊ न शकलेली वसई -विरार महापालिकेची मॅरेथॉन स्पर्धा यंदा ११ डिसेंबरला होणार आहे. यास्पर्धेच्या मार्गात पूर्वपट्टीचा समावेश करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. तर स्पर्धेच्या आयोजनात सर्वपक्षीयांचा समावेश करण्याची मागणी भाजपने केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही पक्षांनी दिला आहे. त्यामुळे यंदाची मॅरेथॉन वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार्‍या ‘मॅरॅथॉन स्पर्धेचा नियोजित मार्ग मागील नऊ वर्षांत पश्चिम पट्ट्यातूनच जात आहे. या स्पर्धा आयोजनात वसई-विरार पूर्व पट्टीचा विचार केला जात नसल्याने या परिसरात राहणार्‍या नागरिकांत अन्यायाची भावना आहे. त्यामुळे यंदाच्या ‘मॅरॅथॉन स्पर्धेचा मार्ग पूर्वपट्टीतून नेऊन जनभावनांचा आदर राखला जावा, अशी मागणी वसई शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या मागणीनंतरही वसई-विरार महापालिकेने न्यायिक भूमिका घेतली नाही तर ‘शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन नालासोपारा विधानसभा उपजिल्हाप्रमुख स्वप्नील बांदेकर, शहरप्रमुख संतोष टेंबवलकर, उत्तम तावडे जितू शिंदे व भरत देवघरे यांच्या उपस्थित महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांना देण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय कामात सत्ताधार्‍यांची ढवळाढवळ अधिक दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासकीय कार्यकाळात प्रशासनाच्या कोणत्याही कार्यक्रमात किंवा पूर्व नियोजनात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश असावा. अन्यथा भाजप अशा कार्यक्रमाचा जाहिर निषेध करील. ११ डिसेंबर रोजी होणार्‍या मॅरेथॉनच्या पूर्वनियोजनासाठी १ नोव्हेंबर रोजी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीबाबत भाजपला कोणतीही सूचना दिली गेली नव्हती. मात्र बहुजन विकास आघाडीचे नेते त्या बैठकीस उपस्थित असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी केला आहे. मॅरेथॉनचे आयोजन महापालिकेने केले आहे की बहुजन विकास आघाडीने? असा सवाल बारोट यांनी उपस्थित केला आहे. यावर चार दिवसांत लेखी उत्तर द्या, अन्यथा ९ डिसेंबर रोजी महापालिका मुख्य कार्यालयासमोर भाजपतर्फे काळे झेंडे दाखवून प्रशासनाच्या वृत्तीचा निषेध नोंदवला जाईल असा इशारा बारोट यांनी दिला आहे.

०००

वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यात ‘मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेला अ‍ॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय)द्वारे राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे या स्पर्धेत प्रसिद्ध धावपटूंसोबत स्थानिक प्रतिष्ठित नागरिकही सहभागी होत असतात. गेल्या अडीच वर्षांपासून वसई -विरार महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्यामुळे येत्या ११ डिसेंबरला होणार्‍या यंदाच्या मॅरेथॉनला महापौर मॅरेथॉनऐवजी व्हीव्हीसीएमएस मॅरेथॉन २०२२ असे नाव देण्यात आले आहे.

First Published on: November 7, 2022 8:57 PM
Exit mobile version