Virar News: अपघात दुर्घटनेनंतर टॅंकर तपासणी मोहीम

Virar News: अपघात दुर्घटनेनंतर टॅंकर तपासणी मोहीम

विरार: टॅंकरमुळे झालेल्या अपघातात वसई विरारमध्ये वीस दिवसांत  तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर आता विरार वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पहिल्याच दिवशी ८ टॅंकरवर कारवाई करण्यात आली आहे. याआधी अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी टॅंकर चालक मालक यांच्या बैठका घेतल्या होत्या तर वारंवार सूचनाही केल्या होत्या. मात्र अवघे काही दिवस नियमांचे पालन होते. मात्र त्यानंतर पुन्हा नियम धाब्यावर बसवून टॅंकर चालकांचा बेदरकारपणा सुरूच आहे. सद्यस्थितीत उन्हाळा असल्याने वसई विरार भागात टॅंकरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नादुरुस्त, कालबाह्य, जुनाट असे टॅंकरही रस्त्यावर धावू लागली आहेत.

त्यामुळे अपघात होतात.परंतु,गेल्या 20 दिवसांत 3 मृत्यू झाल्यानंतर पोलीस यंत्रणा आक्रमक झाली आहे.ज्या भागात टॅंकरद्वारे पाण्याची वाहतूक अधिक होत आहे अशा ठिकाणी टॅंकर थांबवून टॅंकरचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना असलेला वाहनचालक, बॅच, क्लीनर, पाणी गळती, रिफ्लेक्टर अशा सर्व बाबी तपासून घेतल्या जात आहेत. पहिल्याच दिवशी विरार वाहतूक पोलिसांनी ८ टॅंकरवर कारवाई केली आहे. तर जानेवारीपासून ते आतापर्यंत १०५ टॅंकरवर कारवाई करून सुमारे १ लाख ३५ हजार इतका दंड आकारला आहे. २ एप्रिलला विरारच्या जकात नाका येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला टॅंकरने चिरडले यात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर १९ एप्रिलला विरारच्या ग्लोबल सिटीमध्ये टॅंकर मागे वळण घेताना आजी आणि नातू या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वीस दिवसांतच ३ जणांचा टॅंकर अपघातात मृत्यू झाल्याने या प्रकराला रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून टॅंकर तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे.

 

First Published on: April 23, 2024 9:53 PM
Exit mobile version