वाढीव गाववासीय मरणयातनेतून सुटणार?

वाढीव गाववासीय मरणयातनेतून सुटणार?

वसईः वाढीव गाववासियांच्या मरणयातना सुटणार असून वैतरणा पुलावर पादचारी पूल बनवण्यात येणार असल्याची ग्वाही पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अशोक मिश्र यांनी खासदार राजेंद्र गावित यांना दिली. खासदार गावित यांनी रेल्वे प्रश्नांवर महाप्रबंधक यांच्यासह विविध विभागाची बैठक पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भवन येथे आयोजित केली होती.तसेच वसईच्या पाणजू बेटाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला असल्याची माहिती महाप्रबंधक मिश्र यांनी खा. गावित यांनी रेल्वे प्रश्नांवर आयोजित केलेल्या या बैठकीत दिली. भाईंदर पुलावरून पाणीपुरवठा जलवाहिनी पाणजू येथे आणण्यासाठी सुमारे ९ कोटी मंजूरही झाल्याने येत्या काळात या कामालाही सुरुवात होऊन पाणजूवासीयांचे पाणी संकट टळणार आहे. डहाणूहुन सकाळी ७.०५ वाजताची लोकल पूर्ववत करण्याची खासदारांची मागणी ग्राह्य धरत ती पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. खानदेश एक्सप्रेसला डहाणू येथे लवकरच थांबा दिला जाईल, त्यासाठी प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत हा थांबा विचारविनिमय करून लवकरच देऊ असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने प्रवासी वर्गासह गावित यांना दिले.

वांद्रे-अजमेर-मैसूर या रेल्वेगाडीला पालघर येथे थांबा द्यावा अशी सूचना खा. गावित यांनी केली असून दौंड-इंदोर-पुणे, वांद्रे -भावनगर,वांद्रे-भुज- कच्छ, दादर- बिकानेर, वांद्रे -पाटणा, वांद्रे -गाझिपुर एक्सप्रेसना पालघर येथे प्रवासी वर्गाच्या मागणी लक्षात घेऊन थांबे द्यावे अशी आग्रही मागणी गावित यांनी रेल्वे महाप्रबंधक मिश्र यांना केली.पश्चिम रेल्वेच्या डहाणू वैतरणा रेल्वे स्थानकांदारम्यान भौतिक सुविधा, प्रवासी सुरक्षा, सरकते जिने, अतिक्रमण, शीत शवागारगृह, रेल्वे गाडी माहिती सूचना दर्शक इंडिकेटर, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा प्राप्त करून द्या अशीही मागणी गावित यांनी केली असता विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पात या सुविधा अंतर्भूत असून लवकरच प्रकल्पासह या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील असे मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाने यावेळी माहिती दिली.
डहाणू-वैतरणा दरम्यान सध्या बारा डब्याच्या लोकल धावत आहेत. पंधरा डब्यांच्या लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याची आवश्यकता यावेळी खासदारांनी व्यक्त केली. पनवेल डहाणू मेमु सकाळी व संध्याकाळच्या वेळेस दोन फेर्‍या वाढवाव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींमार्फत करण्यात आली. वेळापत्रक लक्षात घेऊन फेरी वाढविण्याचा विचार करू असे महाप्रबंधक मिश्र यांनी सांगितले.

First Published on: March 10, 2023 9:51 PM
Exit mobile version