पाण्यासाठी रस्त्यांची वाट लावणाऱ्यांवर वरदहस्त कोणाचा?

पाण्यासाठी रस्त्यांची वाट लावणाऱ्यांवर वरदहस्त कोणाचा?

ज्ञानेश्वर पालवे,मोखाडा:  तालुक्यात जवळपासपास २००कोटींहून अधिकचा निधी खर्च करून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे.हर घर जल या उद्दात हेतूने हे काम मंजूर झालेले असले तरीही ठेकेदार आणि जलजीवन मिशनच्या अधिकार्‍यांच्या आडमुठ्या कारभारामुळे तालुक्यातील रस्त्यांची मात्र वाताहात झालेली आहे. याशिवाय अनेक गावात वेगवेगळ्या स्वरूपात दररोज नुकसान करणे, काही गावांची तर या खोदकामामुळे रस्ता अरुंद होवून बससेवाही बंद झाली आहे. तर कुठे थेट बुलडोझर डांबरी रस्त्यावर चालवून रस्ते उखडून फेकले जात आहेत. याबाबत दररोज तक्रारी होत आहेत. आंदोलनाचे इशारे जात आहेत. ग्रामस्थ कुठे न कुठे काम बंद करीत आहेत.
तरीही या ठेकेदारावर कसलीही कारवाई होत नाही, याबाबत मात्र कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे योजना राबवणारे अधिकारी आणि ठेकेदार समजून न घेता दररोज रस्ते उखडण्याचे काम करत आहेत.रस्त्यापासून १५ मीटर लांब खोदकाम करण्याचा नियम असूनही थेट रस्त्यांच्या कडेला खोदून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

तर कुठे पुलही कमकुवत होत आहेत. भुसभुशीत झालेल्या जागांमुळे गाड्या खचून अपघात होत आहेत.याबाबत दररोज तहसीलदार पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी तक्रारी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.याशिवाय वर्तमान पत्रातूनही दररोज बातम्या प्रसारित होत आहेत. असे असतानाही संबधीत ठेकेदारांवर कसलीही कारवाई कोणाकडूनच होत नसल्याने ठेकेदारांकडून यासंबंधी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची आर्थिक मुस्कटदाबी केली आहे की ठेकेदार कोण्या मोठ्या राजकीय नेत्यांचा नातेवाईक असल्यामुळे राजकीय दबाब आहे, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

First Published on: January 12, 2023 10:13 PM
Exit mobile version