अनोंदणीकृत सावकारी कर्जाचा बळी ठरला तरुण

अनोंदणीकृत सावकारी कर्जाचा बळी ठरला तरुण

जव्हार: जव्हार शहरातील एका कापड व्यापार्‍याने धंद्यासाठी घेतलेल्या सावकारी कर्जाची परतफेड न झाल्याने दरदिवशीच्या तगाद्याने व्यापार्‍याचे मानसिक खच्चीकरण होऊन तरुण व्यवसायिकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सावकारी कर्जाला शासनाची मान्यता नसतानाही काही सावकारांचा धंदा आजही ग्रामीण भागात फोफावला आहे. सावकारांकडून कर्जदाराला २० ते २५ टक्के चक्रवाढ व्याजाने कर्ज दिले जाते. या कर्जामुळे बळी ठरलेल्या व्यापार्‍याच्या आत्महत्येचा प्रकार जव्हार शहरात उजेडात आला आहे.

जव्हार शहरातील गांधी चौकात एका खासगी गाळ्यात वसीम फारुख मेमन. वय-२७ यांचे “एस एम डी गारमेंट” हे कापड व्यापार्‍याचे दुकान आहे. याने कपड्याच्या धंद्यासाठी सावकारांकडून कर्ज घेतले होते. मात्र मागील दोन वर्षात कोरोना काळात व्यावसायाची दैना झाली होती. वाढती स्पर्धा याला सामना करावा लागत असल्याने व्यापारी हैराण आहेत. त्यातच वसीम मेमन यांनी धंद्याला घेतलेल्या कर्जाचा परतपेढीसाठी सावकारांकडून धमकी व तगादा लावत असल्याने कंटाळून त्याने शनिवारी सायंकाळी -६.३० च्या सुमारास दुकानात फाशी घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचा अधिक तपास जव्हार पोलीस स्टेशनच्या पी.एस.आय सुर्यवंशी मॅडम करीत आहेत. या व्याज माफियांवर पोलिसांकडून काय कारवाई होणार? याकडे सर्व व्यापार्‍यांचे लक्ष लागले आहे. वसीम मेमन यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, आई-वडिल असा परिवार आहे.

प्रतिक्रिया

सावकारी कर्जापोटी व्यापार्‍यांना कर्ज परतपेढीसाठी धमकावल्याने व्यापार्‍यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. वसीम मेमन यांना धमकवणांर्‍यावर गुन्हा नोंदवावा. तसेच, कर्ज घेतलेल्या व्यापार्‍यांनी तक्रारीसाठी पुढे यावे.
– अरमान मेमन,
मेमन समाज युवा अध्यक्ष, जव्हार.

First Published on: August 25, 2022 10:01 PM
Exit mobile version