महागाईपासून लवकरच दिलासा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली ग्वाही

महागाईपासून लवकरच दिलासा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली ग्वाही

नवी दिल्ली : महागाईतील होरपळ लवकरच कमी होईल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत दिली. महागाई कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून लवकरच महागाई नियंत्रणात येईल, असे सांगत, सरकारच्या या प्रयत्नांमुळे नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई 5.88 टक्क्यांवर आली असल्याचे अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केले.

अन्न, इंधन आणि उत्पादित वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे नोव्हेंबरमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर (WPI) आधारित महागाई 21 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. महागाई नियंत्रणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ती आणखी कमी करण्यासाठी सरकार सर्वसामान्यांसाठी काम करेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई मे महिन्यापासून घसरत आहे. ऑक्टोबरमध्ये तो एक आकडी म्हणजेच 8.39 टक्क्यांवर आला होता. नोव्हेंबर 2022 पूर्वी महागाईचा सर्वात कमी स्तर फेब्रुवारी 2021मध्ये होता. त्यावेळी तो 4.83 टक्के होता. नोव्हेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 1.07 टक्क्यांवर होता, जो आधीच्या महिन्यात 8.33 टक्के होता.

भारत-चीन संघर्षावरून काँग्रेसचा सभात्याग
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये एलएसीवर झालेल्या भारत आणि चीनच्या झालेल्या चकमकीवरून आज संसदेत गदारोळ झाला. या मुद्द्यावर चर्चेची आग्रही मागणी विरोधकांनी केली आणि ते या मागणीवर ठाम आहेत. तवांगमधील धुमश्चक्रीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कालच संसदेत निवेदन केले होते. भारतीय हद्दीत घुसखोरी करू पाहणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी पिटाळून लावले होते, असे ते म्हणाले होते. संरक्षणमंत्र्यांच्या या निवेदनाने काँग्रेसचे समाधान झाले नाही, म्हणून काँग्रेस सदस्यांनी दोन्ही सभागृहात सभात्याग केला.

First Published on: December 14, 2022 6:44 PM
Exit mobile version