कुंदन ज्वेलरीने द्या ट्रॅडिशनल लूक!

कुर्ती, चुडीदार, साडी अशा कोणत्याही ट्रॅडिशनल आऊटफिटवर हे दागिने अगदी बिनधास्त घालता येतात. गोल्ड किंवा कॉपर प्लेटेड अशा फॉरमॅटमध्ये स्टोन्सवर कुंदन केलं जातं. या अ‍ॅक्सेसरीज वजनाला थोड्या जड असतात इतकंच. पण तो भाग सोडला, तर या अ‍ॅक्सेसरीज आपल्याला एक ट्रेण्डी आणि मॉड लूक देऊ शकतात हे नक्की.

नेहमी नेहमी कानात, हातात आणि गळ्यात अशा सगळ्या अ‍ॅक्सेसरीज घातल्या की एकूण व्यक्तिमत्त्वाला खूप गॉडी लूक येतो. म्हणूनच हे कुंदनवाले कानातले घातले की शक्यतो गळ्यात काही घालू नका. हे कानातले लांब म्हणजे हँगिग असतात, त्यामुळे गळ्यातलं नाही घातलं तरी चालतं. असे लांब कानातले घातले की थेट बांगड्याच घाला. हे कॉम्बिनेशन दिसतं पण मस्त आणि तुम्हाला वेगळा लूकही देतं.

ग्रीन स्टोन आणि मोती असं कॉम्बिनेशन या अ‍ॅक्सेसरीजमध्ये खूप चालतं. अर्थात हे कॉम्बिनेशन प्रत्येक आऊटफिटवर जाईल असं नाही. पण रंग कोणतेही असले तरी हिरवे स्टोन्स आणि मोती त्यात गुंफलेले असतात. कुंदन ज्वेलरीत पातळ बांगड्या सहसा मिळत नाहीत. मोठ्या आकाराच्या पसरट पण तितक्याच आकर्षक बांगड्या यात मिळतात. यावर प्रचंड कोरीव काम केलेलं असतं. वेगवेगळ्या रंगांचे स्टोन्स लावून त्या आणखीनच सजवल्या जातात. काही वेळा झुमके लावून या बांगड्यांना टीपिकल ट्रॅडिशनल लूक दिला जातो. त्या झुमक्यांनाही खूप नाजूक कुंदन केलं जातं.

दरवेळी सोन्याच्या किंवा काचेच्या नाही, तर मग स्पार्कल बांगड्या घालण्यापेक्षा या बांगड्या खूप चांगल्या दिसतात. या बांगड्यांमुळे परफेक्ट एथनिक लूक येतो. ‘देवदास’, ‘जोधा-अकबर’, यासारख्या सिनेमांमध्ये आपण असे दागिने पाहिलेत. पण ते फक्त त्या काळापुरतेच मर्यादित आहेत, असं मात्र नाही. आता सगळ्याच सिनेमांमधल्या, मालिकांमधल्या हिरॉइन्स पाहिल्या, तर कुंदन ज्वेलरीचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात.

कॉटनच्या ड्रेसेसवर मात्र ही ज्वेलरी तितकी उठून दिसत नाही. सिंथेटिक ड्रेस किंवा सिल्क साड्यांवर हे कानातले आणि बांगड्या मॅच होतात. या कुंदन ज्वेलरीला वेगळी अशी काही नावं नाहीत. तुम्ही दुकानात जाऊन कुंदन वर्क दागिने मागितलेत, तर तुम्हाला हे दागिने सहज पाहायला मिळतील.

मोराच्या आकारापासून ते फूल, दिवे अशा कोणत्याही आकारात आणि विशेष म्हणजे साजेशा रंगात हे दागिने उपलब्ध आहेत. व्हरायटी म्हणजे किती आणि काय ते या दागिन्यांकडे पाहून लक्षात येईलच. त्यातून तुम्हाला काय छान दिसतं त्यानुसार तुम्ही खरेदी करुन तुम्ही फॅशनमधील तुमचा वेगळेपणा आणू शकता.

First Published on: October 7, 2018 2:56 AM
Exit mobile version