PHOTO : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा केंद्रीय मंत्री रिंगणात

PHOTO : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा केंद्रीय मंत्री रिंगणात

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होत आहे. दुसऱ्या फेरीत मणिपूरसह 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांवर मतदान होत आहे. या जागांसाठी एकूण 1202 उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात सहा केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. या मंत्र्यांमध्ये गजेंद्र सिंह शेखावत, वीरेंद्र खाटिक, कैलाश चौधरी, राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलाजे आणि व्ही. मुरलीधरन यांचा समावेश आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत पुन्हा एकदा त्यांच्या पारंपरिक जोधपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शेखावत सलग दोनदा येथून विजयी झाले आहेत. 2019 मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र आणि काँग्रेस उमेदवार वैभव गेहलोत यांचा पराभव केला होता. त्यावेळी येथे 68.89% मतदान झाले होते. तर, आता त्यांचा सामना काँग्रेसच्या करण सिंह यांच्याशी आहे.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी पुन्हा एकदा बाडमेरमधून निवडणूक लढवत आहेत. 2019मध्ये कैलाश चौधरी येथून विजयी झाले होते. यावेळी त्यांचा सामना काँग्रेसचे उम्मेदाराम बेनिवाल आणि अपक्ष उमेदवार रवींद्रसिंह भाटी यांच्याशी आहे. 2019मध्ये कैलाश चौधरी यांनी माजी अर्थमंत्री जसवंत सिंह यांचा मुलगा आणि काँग्रेस उमेदवार मानवेंद्र सिंह यांचा पराभव केला होता. त्यावेळी 73.30% मतदान झाले होते.

सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र खटीक हे मध्य प्रदेशातील टिकमगड मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आहेत. 2019मध्ये वीरेंद्र खटीक येथून विजयी झाले होते. त्यावेळी 66.62% मतदान झाले होते. आता त्यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार पंकज अहिरवार रिंगणात आहेत.

 

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हे केरळमधील तिरुवनंतपुरम मतदारसंघातील भाजपा उमेदवार आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे शशी थरूर आणि भाकपाचे पन्नियान रवींद्रन यांच्याशी आहे. 2019मध्ये येथून शशी थरूर विजयी झाले होते. त्यावेळी 73.74% मतदान झाले होते.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे कर्नाटकातील बंगळुरू उत्तर मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत शोभा यांनी उडुपी चिकमंगळूरमधून भाजपाच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपाचे डीव्ही सदानंद गौडा बेंगळुरू उत्तर मतदारसंघातून विजयी झाले होते. आता शोभा करंदलाजे यांच्याविरोधात काँग्रेसचे प्रा. एम.व्ही. राजीव गौडा रिंगणात आहे. 2019मध्ये बेंगळुरू उत्तरमध्ये 54.76% मतदान झाले होते.

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे अटिंगल मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर रिंगणात उतरले आहेत. मुरलीधरन हे महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य आहेत. 2019मध्ये अटिंगलमधून काँग्रेसचे अदूर प्रकाश विजयी झाले होते. आताही काँग्रेसने अदूर प्रकाश यांना पुन्हा संधी दिली असून माकपाकडून व्ही. जॉय हे देखील रिंगणात आहेत. 2019मध्ये येथे 74.48% मतदान झाले होते.


Edited by Manoj S. Joshi

First Published on: April 26, 2024 10:25 AM
Exit mobile version