मुंबई – गोवा महामार्गावर ३ लाख ८५ हजारांचा मद्य साठा जप्त

मुंबई – गोवा महामार्गावर ३ लाख ८५ हजारांचा मद्य साठा जप्त

महाड उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर मद्य वाहतूक करणार्‍या वाहनाचा पाठलाग करून मद्य वाहतूक करणार्‍यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी बेकायदेशीर मद्य साठा देखील जप्त करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

महाड उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक प्रवीण सोनवणे व त्यांच्या टीमने सापळा रचला. रात्री दिडच्या सुमारास एक ओमनी कार चिपळूणच्या दिशेने येताना दिसली. त्या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार न थांबता महाडच्या दिशेने आली. ही कार तुर्भे येथील पुलाजवळ गोवा विदेशी मालाचे बॉक्स गाडीतून उतरवत असताना आढळून आली. याचवेळी त्यांना रंगेहात पकडण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले. याप्रकरणी गोवा विदेशी मद्याचे ४५ बॉक्स सह ओमनी कार व दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. व्यंकटेश मधुकर महाडिक (वय ३९, राहणार चिपळूण), रमेश अनंत गायकवाड (वय ४५, राहणार कुंभार आळी महाड) अशी आरोपींची नावे आहेत.

उत्पादन शुल्क निरीक्षक प्रवीण सोनवणे, दुय्यम निरीक्षक शंकर जाधव, जवान सुरेंद्र महाले, चेतन भोई यांनी या कारवाईमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला होता. या कारवाईचा अधिक तपास जिल्हा अधिक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक शंकर जाधव हे करीत आहेत.

First Published on: January 17, 2022 9:28 PM
Exit mobile version