महाडमधील ६३ शाळा बंद होण्याच्या मार्गावर

 

महाडमधील ६३ शाळा बंद होण्याच्या मार्गावर
कमी पट संख्येतील विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन
महाड
राज्य शासनाच्या नवीन शिक्षण धोरणानुसार कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा थेट बंद न करता याठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या अन्य शाळेत समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाड तालुक्यातील १ ते ५ पट संख्या असलेल्या ६३ शाळांवर गदा आली आहे. एकीकडे येथील भौगोलिक स्थिती पाहता विद्यार्थी समायोजन शक्य नसल्याचे दिसून येत असले तरी या निर्णयाने कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होत आहे.
शासनाच्या शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील १ ते ५ पट संख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य जवळच्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही संख्या दहा पटसंख्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे अनेक शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता नवीन धोरणामुळे १ ते ५ पट संख्या आतील शाळा थेट बंद न करता येथील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत प्रवेश देवून भविष्यात या शाळा बंद करण्याचा घाट घातल्याचे यावरून दिसून येत आहे. महाड तालुक्यात यापूर्वी दहा पट संख्या असलेल्या शाळांचा आकडा शेकड्यावर होता. मात्र शिक्षण विभागाकडून राबवलेले विविध उपक्रम यातून ही संख्या घटली आहे. मात्र या नवीन धोरणामुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

१०० शाळांचे अस्तित्व धोक्यात
महाड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३०१ प्राथमिक शाळा आहेत. यापैकी १ ते ५ पट संख्या असलेल्या शाळेच्या यादीत जवळपास ६३ शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आकडा हा महाड तालुक्याचा आहे. तालुक्यात शाळांची संख्या अधिक असली तरी शिक्षक भरती नसल्याने शिक्षकांची संख्या कमी आहे. मंजूर पदे आणि कार्यरत शिक्षक यामध्ये तफावत आहे. सद्या तालुक्यात केंद्रप्रमुख १८, पदवीधर शिक्षक ३० आणि उपशिक्षक ५६, तर उर्दू माध्यमाची १३ शिक्षकांची संख्या रिक्त आहे. दहा वर्षापूर्वी तालुक्यात ३३४ प्राथमिक शाळा होत्या आज ही संख्या घटत ३०१ वर आली आहे. येत्या कांही वर्षात तालुक्यातील प्राथमिक शाळांतील कमी पट संख्या असलेल्या जवळपास १०० शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सद्या दहा पट संख्या आतील शाळांची संख्या जवळपास ११४ वर गेली आहे.

नवीन परिपत्रकानुसार कमी पट संख्या असलेल्या शाळांची माहिती तयार झाली असून शाळा बंद न करता या शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजन केले जाणार आहे,
– सुनिता पालकर,
गट शिक्षण अधिकारी, महाड

महाड तालुक्यातील भौगोलिक स्थिती पाहता याठिकाणी समायोजन देखील शक्य नाही. डोंगरावर राहणारा विद्यार्थी पायथ्याला शाळेत कसा येणार? हा प्रश्न आहे शिवाय अनेक गावातून प्रवासी वाहन सुविधा देखील नाही.
– लक्षमण जाधव,
ग्रामस्थ, तुडील

First Published on: November 16, 2022 10:12 PM
Exit mobile version