शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उभा राहतोय शिवकालीन देखावा

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उभा राहतोय शिवकालीन देखावा

निलेश पवार / महाड
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा २ आणि ६ जून रोजी जल्लोषात साजरा होत आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता आजपासून लाखो शिवभक्त दाखल होणार आहेत. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने राज सदरेसमोर भव्य दिव्य ऐतिहासिक देखावा उभा राहत आहे याचे कामही अंतिम टप्प्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइन पद्धतीने तमाम उपस्थित शिवभक्तांना संबोधित करणार आहेत.
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून प्रशासनाकडून जवळपास ३० समित्या स्थापन करून त्यांच्यामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा २ जून २०२३ तिथीप्रमाणे राज्याभिषेक तर ६ जून २०२३ रोजीचा तारखेप्रमाणे राज्याभिषेक साजरा होत आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मंडप, वीजपुरवठा, गर्दी नियंत्रण, अग्निशमन, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे आणि वापरावयाचे पाणी, भोजन, स्नानगृह तसेच शौचालय, स्वच्छता, कचरा,परिवहन, पार्किंग, रोप-वे,रस्ते, मोबाईल नेटवर्क, पोलीस बंदोबस्त, सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ल्याचे सौंदर्यीकरण,आपत्ती व्यवस्थापन अशा विविध बाबींच्या नियोजनासह शासन आणि प्रशासन आपली सेवा देण्यासाठी आणि आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहोत. आपणही कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.
आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज किल्ले रायगड येथे दि.२ जून रोजी होणार्‍या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहणी केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सत्यजित बडे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशीद, मुख्याधिकारी महादेव रोडगे, कार्यकारी अभियंता श्री.महेश नामदे, श्रीमती संजीवनी कट्टी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ कर्नल सुपणेकर तसेच इतर विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त
किल्ले रायगडावर काळा हौद आणि बारा टाके यातून गंगासागर तलावामध्ये पाणी आणून त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केले जात आहे. त्याच्रमाणें गडावर आणि पायथ्याला स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. गडावर रायगड रोपेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे तसेच शौचालय पाईप, भोजन व्यवस्थेचे साहित्य मंडप साहित्य नेण्यात आले आहे. गडाच्या पायथ्याशी वाहतूक कोंडी होऊ नये याकरता कोंझर, वाळसुरे, वाडा या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणाहून एसटी बसेसच्या माध्यमातून शिवभक्तांना किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येणे शक्य होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणार्‍या शिवभक्तांची गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जवळपास दोन हजार पोलीस किल्ले रायगड आणि परिसरामध्ये तैनात केले गेले आहेत.

पावसामुळे प्रशासकीय कर्मचार्‍यांचे हाल
किल्ले रायगड आणि परिसरामध्ये गेली दोन दिवस सायंकाळच्या सुमारास वादळी वार्‍यासह पाऊस पडत आहे. या पावसामुळे तात्पुरत्या स्वरूपात उभे केलेले नियंत्रण कक्ष आणि त्यामध्ये कार्यरत असलेले प्रशासकीय कर्मचारी पोलीस कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचे चांगलेच हाल होत आहेत. वादळी वारा आणि कोसळणारा पाऊस रायगडावर सुरू असलेल्या तयारीच्या कामात अडथळा ठरत आहे.

First Published on: May 31, 2023 9:56 PM
Exit mobile version