श्रेयवादातून प्रशासकीय भवनाचे दोनदा भूमिपूजन

श्रेयवादातून प्रशासकीय भवनाचे दोनदा भूमिपूजन

शहरात नव्याने बांधण्यात येणार्‍या भव्य प्रशासकीय भवनाचा भूमिपूजन सोहळा विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी 11 वाजता पार पडला. मात्र राज्यातील सत्तेत महाविकास आघाडी असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना या कार्यक्रमात डावलण्यात आल्याने जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश लाड संतप्त झाले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत नियोजित वेळेच्या आगोदरच सकाळी 10 वाजता भूमिपूजन स्थळी पोहचून श्रीफळ वाढवून भूमिपूजन उरकले. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली आहे. एकाच कामाचे एकाच दिवशी दोनवेळा झालेले भूमिपूजन यावर शहरासह तालुक्यात खमंग चर्चा सुरू झाली आहे.

सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी होणार्‍या या भवनाच्या कामाला मंजुरी मिळाल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू होती. त्यापैकी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील मतभेदांचा उद्रेक भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळाला. हे भवन उभे राहण्यासाठी लाड 2004 पासून प्रयत्नशील होते. त्यांनी याबाबत त्यावेळी अधिवेशनात मुद्दाही उपस्थित केला होता. देशाचे तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार 2011 मध्ये नगर परिषदेच्या उद्घाटनाला आले तेव्हा लाड यांनी प्रशासकीय भवनासाठी शहराला लागून असलेली कृषी संशोधन केंद्राची जमीन देण्याची मागणी केली होती.

त्याबद्दल सहानभूतीपूर्वक विचार करू, असे आश्वासन पवार यांनी जाहीरपणे दिले होते. मात्र शहराच्या दोन भागात असलेली दापोली कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राची जमीन देता येणार नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर शहरातील पोलीस मैदान भागातील तहसीलदार निवासस्थान, तेथील तलाठी कार्यालये, मंडळ अधिकारी कार्यालये यांच्या ठिकाणी प्रशासकीय भवन उभारण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने 2014 मध्ये आराखडा तयार केला. मात्र सेना-भाजपची सत्ता आल्याने लाड यांचे प्रयत्न तोकडे पडले. आता शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या काळात या कामाला मंजुरी मिळून निधी प्राप्त झाला असला तरी माजी आमदार लाड यांचे या कामाबाबतचे योगदान विसरता येणार नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

भूमिपूजन सोहळ्याला राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, तसेच लाड यांना आमंत्रण न दिल्याने प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याचा आरोप लाड यांनी थोरवे यांच्यावर करीत जल्लोषी वातावरणात भूमिपूजन सोहळा उरकून घेतला. त्यानंतर थोरवे यांनी भूमिपूजन केले. भाषणात त्यांनी लाड यांच्या वयोमानामुळे ते माजी आमदार असल्याचा विसर पडला असून, आघाडीत बिघाडी करू नका असा सल्ला दिला. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवत मोठ्या गर्दीत भूमिपूजन सोहळा पार पडला.

First Published on: May 28, 2021 7:43 PM
Exit mobile version