भिसेगाव विकासाच्या प्रतीक्षेत; नगर परिषद समस्या कधी सोडविणार?

भिसेगाव विकासाच्या प्रतीक्षेत; नगर परिषद समस्या कधी सोडविणार?

कर्जत: नगर परिषद हद्दीतील भिसेगाव हा प्रभाग विकासापासून वंचित राहिला आहे. नगरपरिषद विकास कामांना निधी मिळण्यासाठी बैठकीमध्ये विषय मांडून ठराव घेतला जातो परंतु निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने या प्रभागात नागरिकांना विकासापासून वंचित राहावे लागत आहे.
भिसेगावात अनेक सोसायटी मोठ्या प्रमाणात उभारले गेले आहे. लोकवस्तीही वाढली असल्याने नव्याने समस्या उद्भवत आहे. मात्र आधीच्या समस्या सुटल्या नसून त्यात नवीन समस्यांची भर पडत असल्याने नागरिकांंमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वेळेवर पाणी पट्टी भरून ही पाण्याची तीव्र समस्या जाणवत आहे. रस्ते अर्धवट स्थितीत आहे तर काही ठिकाणी रस्ते केले पण गटारचे काम अपूर्ण अवस्थेत आहेत. दिशा दर्शक फलक नाही, प्रशस्त उद्यान नसल्याने बच्चे कंपनीला तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छंद फिरण्यासाठी मोकळे ठिकाण नाही. शांत बसण्यासाठी आणि विरंगुळासाठी उद्यान नाही, रस्त्याच्या कडेला सुशोभीकरण वृक्ष नाही, अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात नाही. अनेकदा पत्रव्यवहार करून ही नगरपरिषद दुर्लक्ष करीत आहे, कचर्‍याचा ढीग पडला जातो, अनेकदा नाले साफसफाई करतात आणि तसाच गाळ ठेऊन जात असल्याने दुर्गंधी पसरते, कीटक जंतुनाशके पसरत असले तरी कीटक निर्जंतूकीकरणांची फवारणी केली नाही यामुळे आजारांना आयतेच आमंत्रण दिले जात आहे अशा प्रकारच्या तक्रारींचा पाढा स्थानिक जनतेतून ऐकायला मिळतो.

गटारांची अवस्था दयनीय
गजानन महाराज मंदिर पासून ते गणेश गोसावी यांच्या घरापर्यंतचा रस्ता यापूर्वी नगरपरिषदेकडून केला गेला. मात्र दरम्यानच्या काळात या रस्त्याला लागून असलेल्या गटारांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या परिसरातील नागरिकांनी गटारे बंदिस्त करण्याची विनंती अनेकदा नगरपरिषदकडे केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

नागरीकांची नाराजी
भिसेगाव खिंडी जवळ बाजीप्रभु देशपांडे तसेच गावाच्या मध्यभागी छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमा उभारले असून त्यांच्या आजूबाजूला कचरा टाकला जातो. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचे विटंबना होत असल्याने नागरिकांनी नगरपरिषदेवर नाराजी दर्शविली आहे.

बंदिस्त गटारे करण्यासाठी ठराव मंजूर असून निधी अभावी काम थांबले आहे.त्याचप्रमाणे आरोग्य विभागाला वारंवार सांगून ही ते दुर्लक्ष करीत आहे. लवकरात लवकर परिसरातील समस्या स्वतःच्या देखरेखीखाली सोडविण्यात येईल.
– सोमनाथ ठोंबरे (नगरसेवक)

First Published on: March 27, 2023 9:21 PM
Exit mobile version