कालवे पडले कोरडे,भातलागवड ठप्प; पाताळगंगा परिसरातील स्थिती

कालवे पडले कोरडे,भातलागवड ठप्प; पाताळगंगा परिसरातील स्थिती

रसायनी: धारणत: खालापूर तालुक्याच्या शेती भागात १५ डिसेंबरपर्यंत कालव्याला पाणी येत असते. मात्र पाताळगंगा परिसरातील माजगांव,आंबिवली,वारद,पौध तसेच या परिसरातील जोडणार्‍या आदिवासी वाड्या असून २०१७ पासून कालवे कोरडे पडले आहे. मात्र दर वर्षी शेतकरी वर्गांस आश्वासनांची खैरात या पलीकडे काही मिळत नाही.कालव्याची दुरुस्ती झाली की काही महिन्यात पाणी सोडले जाईल, असे आश्वासन दर वर्षी शेतकर्‍यांस मिळत असते.मात्र तसे होतच नाही.एके ठिकाणी सरकार म्हणते की आम्ही शेतकरी वर्गांच्या पाठीशी आहे.मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांना भात लागवडीसाठी पाणी मिळत नसल्याचेच भयाण वास्तव आहे.
रसायनी परिसरात शेकडो हेक्टर जमीन असून शेतकरी या जमिनितून भाताचे उत्पन्न घेत असतात.परंतु कालव्याचे पाणी नियोजित वेळेवर पोहचत नसल्यामुळे उन्हाळी भात लागवड करण्यास शेतकर्‍यांनी मौन धारण केले आहे.गेल्या सहा ते सात वर्षापासून कालव्याचे पाणी शेतीपर्यंत पोहचले नाही.शिवाय कालव्याची दुरवस्था यामुळे भात पेरणीपासून ते लागवडपर्यंत पाण्याची खूप आवश्यक असते.मात्र कालव्याची दुरवस्था झाल्यामुळे शेतीला पाणी मिळत नसल्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांनी भात लागवडीकडे पाठ फिरवली आहे.
२०१७ मध्ये पाणी सोडले मात्र ते शेवटपर्यंत पोहचलेच नाही.यामुळे कालवा दुरुस्त झाल्याशिवाय पाणी पोहचवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र सन २०१८ ते २०२२ या वर्षी कालव्याला पाणी सोडण्यात आले नाही.अनेक ठिकाणी कालव्याची दुरावस्था निर्माण झाल्याने ही स्थिती उद्भवली आहे.

खरसुंडी बंधार्‍यातून पाणी हे कालव्याला सोडले जावे यासाठी प्लास्टीकचे पाईपच्या जागी लोखंडी पाईप बसविण्यात आले आहे. शिवाय या कालव्याची दुरवस्था निर्माण झाली असून इंजिनिअरकडे काम दिले असून ते लवकरात लवकर काम सुरु केले जाईल.
– भारत गुंटुरकर,
उप विभागीय अभियंता, पाटबंधारे खाते

कालव्याला पाणी येत असल्यामुळे दर वर्षी भात लागवड होत असे शिवाय गुरांच्या पिण्याच्या प्रश्न,विहिरीला पाणी राहत असे; मात्र सात ते आठ वर्षापासून पाणी बंद झाल्यामुळे भाताचा दाणा पहावयास मिळत नाही.
– रवि काठावले,
शेतकरी, माजगाव

कालव्याचे पाणी शेतीला यावे यासाठी उप सरपंच पदावर असताना प्रयत्न करीत होतो.त्यासाठी पाटबंधारे अधिकारी यांच्याशी चर्चा करून २०१६ मध्ये पाणी सुद्धा आले होते.मात्र ते शेवटपर्यंत पोहचले नाही. कालव्याचे पाणी शेतीला मिळाल्यास शेतकरी भात शेती करु शकतात.
– राजेश पाटील,
माजी उपसरपंच, ग्रूप ग्राम पंचायत माजगाव
==================

First Published on: December 29, 2022 7:28 PM
Exit mobile version