नारळ उत्पादक बागायतदारांना कोरोनासह चक्रीवादळांचा दणका

नारळ उत्पादक बागायतदारांना कोरोनासह चक्रीवादळांचा दणका

रायगड जिल्ह्यातील भात पिकापाठोपाठ मोठे येणारे उत्पन्न म्हणजे नारळ, सुपारी होय. गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या कोरोना जागतिक महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणि त्यानंतर आलेल्या 3 जूनच्या निसर्ग, तसेच अलिकडच्या तौत्के वादळाच्या दणक्याने सुपारीसह नारळाची बहुतांशी झाडे जमीनदोस्त झाली असून, नारळ उत्पादक बागायतदार आणि व्यापारी हवालदिल झाले आहेत.

मुरुड तालुक्यातील सुमारे 3 हजारांहून अधिक हेक्टर बागायती क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक हेक्टर बागायत क्षेत्रातील उत्पन्न देणारी हजारो नारळाची झाडे चक्रीवादळात भुईसपाट झाली आहेत. या झाडांवरील जवळपास 80 टक्के कच्चा नारळ (शहाळी) यापूर्वी मुंबई, पुण्यासारख्या शहरात व्यापारी आणि दलालांमार्फत विक्रीसाठी जात असत. वर्षभराच्या अथवा 5 वर्षांच्या करारावर शहाळी कढण्याचा ठेका एका झाडाला एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत देऊन व्यापारी, दलाल ते बागायतदारांकडून खरेदी करीत असत. त्यामुळे बागायतदारांसह व्यापारी, दलाल आणि शहाळी काढण्यासाठी झाडावर चढणारे, नारळ गोळा करणारे, त्यांची वाहतूक करणारे, तसेच शहरात विक्रीसाठी घेऊन जाणारे ट्रक, टेम्पो मालक यांना चार पैसे मिळत असत. लॉकडाऊन आणि लागोपाठच्या दोन वादळांमुळे या सर्वांना सध्या बेरोजगारीला तोंड द्यावे लागत आहे.

शहरातील मोठमोठ्या रुग्णालयात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी शहाळ्याचे पाणी म्हणजे जलसंजीवनीच असते. एका शहाळ्याचे पाणी एका ग्लुकोज सलाईन इतकी ताकद रुग्णाला मिळवून देत असल्यामुळे शहरात या कच्च्या नारळाला अर्थात शहाळ्यांना मोठी मागणी असते. परंतु लॉकडाऊनमुळे ट्रक, टेम्पो वाहतूक बंद झाली आहे. एकेकाळी मुंबई आणि वाशी बाजारात दररोज एक ट्रक (अडीच ते तीन हजार शहाळी), तर आठवड्याला आठ ते दहा ट्रक जात होते. परंतु ही संख्या अवघी एक ते दोनपुरती सिमित आहे. तशीच गत सुक्या नारळांचीही झाली आहे. येथील विविध सण, उत्सवांबरोबरच गावोगावी धुमधडाक्यात साजर्‍या होणार्‍या विवाह आणि अन्य सोहळ्यांसाठी हमखास लागणार्‍या नारळांची विक्री सोहळे कमी झाल्याने घटली आहे.

शिवाय चक्रीवादळात झाडांवरील कच्च्या शहाळ्यांचे घड पडून गेल्यामुळे नारळच शिल्लक राहिले नाहीत. परिणामी सुक्या नारळांची बाजारात टंचाई निर्माण झालीआहे. तर उपलब्ध असलेले सुके नारळ स्थानिक ग्राहकांनाही दुप्पट किंमत देऊन खरेदी करावे लागत आहेत. समुद्र किनारी, मंदिरांजवळ आणि बाजारात नारळ, शहाळ्यांची विक्री करुन दररोज चार पैसे मिळवून आपल्या संसाराला हातभार लावणार्‍या गोरगरीब विक्रेत्यांना लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रचंड फटका बसला आहे.

First Published on: May 24, 2021 8:39 PM
Exit mobile version