काँक्रिटीकरणाच्या दर्जाबाबत नाराजी

काँक्रिटीकरणाच्या दर्जाबाबत नाराजी

ताालुक्यातील चौक गावातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थ नाराज असून, चार कोटी निधीप्रमाणे काम होत नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गेल्या काही वर्षांत चौक बाजारपेठ नावारूपाला आली आहे. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजारपेठ आहे. दुकाने, देशी बार, रुग्णालय, हॉटेल यांनी मुख्य रस्त्याचा भाग गजबजला आहे. त्यात भर म्हणून फेरीवाले, टपर्‍यांनी रस्ता व्यापला आहे. चौक गावातील श्री राम मंदिर ते खंडागळे निवासापर्यंत गावातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्यातच मंदिरापासून पुढे पाताळगंगा वसाहतीला जाण्यासाठी रस्ता आहे. हा वर्दळीचा रस्ता आधीच अरूंद, त्यात रिक्षा तळ आणि फेरीवाले यांचे बस्तान यामुळे वाहतूक कोंडी ठरलेली असते.

बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे आपले वाहन रस्त्यातच उभे करून ठेवत असल्याने वाहतूक कोंडी अधिकच वाढते. वाहतूक पोलिसांनी अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून फरक पडलेला नाही. अखेर चौक गावातील मुख्य रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून त्यासाठी चार कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपलब्ध झाला. प्रस्तावित रस्त्याची मोजणी देखील करण्यात आली. 11 मीटरचा रूंद काँक्रीट रस्ता आणि दोन्ही बाजूला सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारे बांधण्यात येणार आहेत. परंतु रस्ता रूंदीकरणात अडथळा ठरणारी घरे, दुकानावर हातोडा चालवावा लागणार होता. त्यामुळे रस्ता रूंदीकरणाला काही भागात विरोध झाला होता. अखेर ग्रामस्थांची सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजयकुमार सर्वगौड यांनी भेट घेत तोडगा काढला.

घरांना, दुकानांना धक्का न लावता 7 मीटर रस्ता आणि दोन्ही बाजूला गटारासाठी एक-एक मीटर असा सुवर्णमध्य काढण्यात आला. वर्षभरापूर्वी चौक गावातील कमानीपासून कामाला सुरुवात देखील झाली. परंतु नंतर लॉकडाऊनमुळे काम रखडत गेले. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली असून, तारापूर भागात काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. परंतु कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने रस्त्याला तडे गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने काम करताना ठेकेदाराकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्याने रस्ता निकृष्ट बनला आहेे. रस्त्याच्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्‍यांनी लक्ष देऊन दर्जाची तपासणी करणे आवश्यक होते परंतु तसे होताना दिसत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा दूरध्वनी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याने संपर्क होऊ शकला नाही. इतका प्रचंड निधी खर्च करून काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने टिकाऊ आणि मजबूत रस्ता तयार व्हावा, इतकीच माफक अपेक्षा ग्रामस्थांची आहे.

काँक्रिटीकरण करताना पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होणे आवश्यक आहे. काम सुरू असताना रस्त्यावर सतत पाणी साठवून ठेवणे आवश्यक होते. परंतु ठेकेदाराकडून दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी तडे गेलेे. इतका निधी खर्च खर्च करून कामाचा दर्जा निकृष्ट असेल तो वर्षभरातच रस्ता खराब होणार आहे.
-विश्वनाथ मते, तारापूर-चौक

First Published on: May 27, 2021 8:28 PM
Exit mobile version