जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

 

 

अलिबाग:रायगड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम करावयाचे आहे. आपण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून रायगड जिल्ह्यासाठी शासनाकडून सन २०२२-२३ करिता प्राप्त झालेला विकासनिधी संबंधित यंत्रणांनी विहीत कालावधीत खर्च करावा, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक गुरुवारी जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे,आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर,आमदार रवी पाटील, आमदार आदिती तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, रोहा उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे तसेच शासकीय विभागांचे विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देवू या, यासाठी सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांचे योगदान निश्चितच महत्वाचे राहणार आहे, असेही पालकमंत्री सामंत म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पालकमंत्री सामंत आणि उपस्थित लोकप्रतिनिधींनी सूचित केलेल्या बाबींबाबत तातडीने संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेवून तात्काळ आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

उपाययोजना पूर्णत्वास न्याव्यात
या बैठकीत मागील बैठकीचे इतिवृत्त आणि त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास समितीमार्फत मान्यता देण्यात आली. सन २०२२-२३ चा प्रारुप आराखडा व सन २०२१-२२ अंतर्गत दि. जानेवारी २०२२ अखेरील खर्चाचा आढावा सादरीकरणाच्या माध्यमातून समितीसमोर मांडण्यात आला. लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांमार्फत प्रलंबित विषयांचा निपटारा होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेली अंमलबजावणी आणि अंतिम टप्प्यात असलेल्या विविध उपाययोजना त्वरीत पूर्णत्वास न्याव्यात, अशा सूचना पालकमंत्री सामंत यांनी दिल्या. तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या विविध विषयांवर जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना यावेळी दिले.

२७५ कोटी इतका निधी वितरीत
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२१-२२ करिता रु.२७५.०० कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून प्राप्त निधीपैकी रु.२७५ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी सप्टेंबर २०२२ अखेर रु.१८१.६१ कोटी इतका निधी खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी ६६.०० टक्के इतकी आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी यांनी यावेळी उपस्थित समिती सदस्यांना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीबद्दल दिली.

First Published on: October 13, 2022 9:38 PM
Exit mobile version