गडकिल्ले संवर्धन करणे काळाची गरज – कैलास घरत

गडकिल्ले संवर्धन करणे काळाची गरज – कैलास घरत

पेण:  गडकिल्ले ही मौज मजा मस्ती करण्याची ठिकाणे नाहीत. त्यांचे पावित्र्य आपण राखले पाहिजे कारण अनेक मावळ्यांच्या बलिदानाची पराक्रमाची साक्ष देत उन वारा पाऊस झेलत अतिशय डौलाने उभे आहेत. आज अनेक गडकिल्यांची दुरावस्था झालेली आहे. त्याला आपणच जबाबदार आहोत. पुनः एकदा या गडकिल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तुम्ही आम्ही युवा वर्गाने एकत्र येवून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. नाहीतर येणार्‍या पुढील पिढीला प्रत्यक्षात गडकिल्ले दाखवता येणार नाहीत. फक्त इतिहासाच्या पुस्तकात गडकिल्ले बघता येतील. म्हणूनच तरुणांनी गडकिल्ले संवर्धन करणे काळाची गरज आहे, परखड मत युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास घरत यांनी व्यक्त केले.
वेळ मिळेल तेव्हा आपल्या मुलांना गडकिल्यांवर घेऊन जा, त्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्यांची वारी घडवा. प्रत्येक किल्यावर घडलेला इतिहास सांगा. किल्ल्याचे विविध भाग त्यांचा उपयोग कशासाठी होत होता हे ही सांगा. गडकिल्ले संवर्धनासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा असे आवाहनही घरत यांनी यावेळी केले.

 जपू या इतिहासाच्या पाऊलखुणा
या गडकिल्ल्यांच्या आणि मावळ्यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्या स्वराज्याचे हे मूक साक्षीदार आहेत. अनेक परकीय आक्रमणे लढाया, बंदुकीच्या गोळ्या तोफांचे हल्ले याच बुरुजांनी एकेकाळी रोखून धरल्या होत्या. गडकिल्ले म्हणजेच आमचे धारातीर्थ आहेत. हाच आमचा इतिहास आहे. ‘जपू या आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा’, हेच छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित असलेलं शिवकार्य केल्याचं समाधान वाटेल, असे मतही घरत यांनी व्यक्त केले.

First Published on: February 10, 2023 9:32 PM
Exit mobile version