अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यवसायाचे नुकसान

अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यवसायाचे नुकसान

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील वीटभट्टी व्यवसाय संकटात सापडला आहे. शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र कमी अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे ऐन हंगामात वीटभट्टी चालक व मालकांना नुकसानीला सामोरे जावे लागले.

सध्या ठिकठिकाणी लहान-मोठया वीटभट्ट्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात कित्येक कोटींची उलाढाल या उद्योगात होते. सध्या सर्वत्रच मोठ्या प्रमाणात विटभट्ट्या सुरू झाल्या आहेत. मात्र अवकाळी पावसामुळे असंख्य कच्च्या विटा खराब झाल्या आहेत. विटा पाडण्यासाठी जमा करून ठेवलेली माती देखील पावसामुळे वाहून गेली किंवा भिजली आहे.

विटा भाजण्यासाठी लागणार भाताचा कोंडा, कोळसा किंवा तूस देखील पावसामुळे भिजल्याने वीटभट्टी लावणे म्हणजेच पक्क्या विटा पडणे देखील मुस्किल झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अशा विविध मार्गाने वीटभट्टी चालक व मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी लॉकडाऊन, आता कडक निर्बंध आणि अवकाळी पाऊस यामुळे वीटभट्टी मालकांना व चालकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

शासनाकडून शेतीसाठी थोडीबहुत नुकसान भरपाई मिळते. मात्र वीटभट्टी चालक व मालकांसाठी तशी कोणतीच तरतूद नाही. परिणामी आलेल्या परिस्थितीवर मात करत तग धरण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही.

First Published on: January 14, 2022 7:52 PM
Exit mobile version