माणगाव नगरपंचायत निवडणुकीत नाट्यमय घडामोडी, ज्ञानदेव पोवार यांचा शिवसेनेत प्रवेश

माणगाव नगरपंचायत निवडणुकीत नाट्यमय घडामोडी, ज्ञानदेव पोवार यांचा शिवसेनेत प्रवेश

माणगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत माणगाव विकास आघाडीने १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि खासदार सुनील तटकरे यांया साम्राज्याला मोठा हादरा दिला. या विजयाचे शिल्पकार आमदार भरत गोगावले, माजी शिक्षण सभापती ऍड. राजीव साबळे आणि ज्ञानदेव पोवार हे ठरले.नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून ज्ञानदेव पोवार आणि प्रशांत साबळे तर राष्ट्रवादीकडून आनंद यादव व रिया उभारे यांचे अर्ज दाखल झालेले आहेत. ४ फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. तर ९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे

गेल्या १५ दिवसात माणगावमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या राजकीय दबावाला बळी न पडता माणगाव विकास आघाडी तर्फे ज्ञानदेव पोवार आणि प्रशांत साबळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. खासदार तटकरे यांनी विविध राजकीय क्लुप्त्या वापरण्याचा प्रयत्न करून पाहिल्या. परंतु, स्वर्गीय माजी आमदार अशोकदादा साबळे यांच्या मुशीत वाढलेले आणि त्यांचे सुपुत्र शिवसेनेचे राजीव साबळे यांनी त्यांच्या दबावाला बळी न पडता तसेच आपले सर्व राजकीय वजन वापरून नगराध्यक्ष पदासाठी ज्ञानदेव पोवार यांचे नाव सुचविले. त्यानंतर ज्ञानदेव पोवार यांनी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

माणगाव नगरपंचायत ५ वर्ष राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. मात्र जनतेने माणगाव विकास आघाडीवर विश्वास दाखवून भरभरून मतदान केले. आणि आघाडीचा १७ पैकी ९ जागांवर विजय झाला. ज्ञानदेव पोवार हे पूर्वी काही वर्षे शिवसेनेतच मोठ्या पदावर होते. परंतु, राजकीय समीकरणामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरल्यानंतर त्यांनी लगेचच शिवसेनेत प्रवेश केला. माणगावचा विकास करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापुढे माणगावचा विकास हाच शिवसेनेचा ध्यास असेल असे प्रतिपादन ज्ञानदेव पोवार यांनी शिवसेनेत दाखल होताना केले.

अर्ज दाखल करताना शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, शिवसेना नेते ऍड. महेंद्र मानकर, डॉ. संतोष कामेरकर, काशिराम पोवार, अंजली पोवार, नितीन बामुगडे, पत्रकार अरुण पोवार, रणधीर कनोजे, विरेश येरूणकर, सुनिल धुमाळ, बबन गायकवाड, उर्मिला साबळे, सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. खांदाड गावातील ज्ञानदेव पोवार यांचे समर्थक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

First Published on: February 4, 2022 9:35 PM
Exit mobile version