पोलादपुरातील सततच्या खंडीत वीज प्रवाहामुळे वयोवृध्द त्रस्त

पोलादपुरातील सततच्या खंडीत वीज प्रवाहामुळे वयोवृध्द त्रस्त

 

 बबन शेलार/ पोलादपूर  
मागील सहा दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील काही भागात वीजेचा लपंडाव सुरुच असून वीज पुरवठा खंडीत झाला तर काही तासही येत नसल्याने आधीच उकाड्याने बेजार झालेल्या वयोवृध्दांना कमालिचे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तरुण मंडळी होणारा त्रास सहन करत असली तरी महाभयंकर उकाडयापुढे वृद्धांचा जीव गळ्याशी येत असून उकाडा सहन होत नसल्याने ‘आता उचल रे बाबा’असे म्हणायची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया एका वयोवृध्द नागरीकाने व्यक्त केली.
गेल्या सहा सात दिवसांपासून तालुक्यात दिवस-रात्री पाच मिनिटांपासून अनेकतास वारंवार वीज प्रवाह खंडीत होत आहे. या सहा दिवसात इतर विभागात वीज पूर्ववत झाली तरी ग्रामीण विभागातील सडवली काटेतळी , धामणदेवी, सुतारवाडी, भरणेवाडी, दत्तवाडी, भोगाव, कातळी या गावामध्ये वीजप्रवाह खंडीत असतो. याच
दरम्यान कोठे कमी दाब तर कोठे उच्च दाब वीज असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी चोळई गावातील गोविंद जाधव, धामणदेवीमधील शांताराम पारदुले, भोगाव खुर्द प्रतिमा शेलार , कातळीतील प्रकाश भोसले आदींसह अनेक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत. या संदर्भात पोलादपूरच्या महावितरण कंपनीचे अधिकारी सुनील सुद यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारा संपर्क साधला तर फोन ‘नॉट रिचेबल’ असतो, त्यामुळे वीजप्रवाह खंडीत झाल्यानंतर कोणतीही माहिती वीज ग्राहकाला मिळत नाही. सध्या पावसाळा पार्श्वभूमीवर देखभाल, दुरुस्तीसाठी वीजप्रवाह बंद करण्यात आला आहे, अशी पूर्व सूचनाही वीज ग्राहकांना देण्यात येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीच्या येथील कार्यालयातील अधिकार्‍यांबाबत प्रचंड असंतोष जनतेत खदखदत आहे.

रात्रीच्या वेळी दाट अंधार असतो या अंधारात बॅटरीचा प्रकाश कुचकामी ठरतो काही दिवसांपूर्वी जंगलात सरपणासाठी गेलेल्या माहिलांना माकडाचे अवयव दिसू न आले असून नागअजगर, धामण, कण्हेर,मणेर या सारख्या विषारी सापांच्या जाती या भागातमोठया प्रमाणावर आहेत जर एखादया व्यक्तीला दिवसा सर्पदंश किंवा विंचु दंश झाला तर १४ किलोमीटरवर तालुक्याच्या ठिकाणी उपचाराकरीता नेता येईल पण रात्रीच्या वेळी वीज प्रवाह खंडीत असताना जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अंधारात हिंस्र प्राण्यांचा धोका मोठा
कशेडी घाटाच्या पायथ्याशी आणि आजूबाजुच्या परिसरात वसलेल्या गावांच्या सभोवती घनदाट जंगलाचे वेष्टन आहे. येथील जंगल भागात तरस, कोल्हे, रानडूक्कर, बिबट यासारख्या हिंस्त्रप्राण्यांचा वावर आहे. रात्रीच्या वेळी घराच्या पडवीत असलेली कुत्री नाहीशी होत असल्याच्या घटना घडत आहेत. एका शेतकर्‍याच्या जर्सीगायीला बिबट्याने ठार केल्याची घटना आणि रान डुक्कराच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराच्या बाजूला असलेल्या शौचालयात शौचास किंवा लघु शंकेस जाण्यास बाहेर पडणार्‍या व्यक्तीव र वीज नसेल तर हिंस्र प्राण्यापासून धोका आहे.

महावितरण कंपनीच्या पोलादपूर कार्यालयाकडून आगामी पावासाळ्यात वीज सुरळीतपणे चालू राहील याची दखल घ्यावी आणि आम्हा साठी पार केलेल्या वृद्घांना दिलासा द्यावा ही माफक अपेक्षा.
– प्रतिमा शेलार,
ग्रामस्थ, भोगाव बुद्रूक

ऐन उन्हाच्या कडाक्यात वीज प्रवाह वारंवार बंद पडत असल्याने जीव नकोसा झाला आहे.
-गोविंद जाधव,( चोळई ); प्रकाश भोसले ( कातळी ) ग्रामस्थ

First Published on: June 8, 2023 10:18 PM
Exit mobile version