रायगड जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन घटले; समुद्रकिनारी भराव, रासायनिक पाण्यामुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत

रायगड जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन घटले; समुद्रकिनारी भराव, रासायनिक पाण्यामुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत

समुद्रकिनारी करण्यात येणारा भराव, समुद्रात सोडण्यात येणारे कंपन्यांचे रासायनिक पाणी यामुळे रायगड जिल्ह्यात मत्स्य उत्पादन घटल्याचे समोर आले आहे. सरासरीच्या तीन हजार मेट्रीक टन एवढे मत्स्य उत्पादन घटले असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाकडील आकडेवारीवरुन सिद्ध होते. मत्स्य उत्पादन घटल्याने मासेमारांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र, मत्स्य उत्पादन घटले असले तरी जिल्ह्यात मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याएवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसल्याचे मत्स्य उत्पादन विभागाने स्पष्ट केले.

राज्याला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या किनार्‍यावर दर्जेदार मासळी मिळते. त्यासाठीच कोकणची किनारपट्टी ओळखली जाते. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील ११२ गावांमध्ये मासेमारीचा व्यवसाय चालतो. ४ हजार ९४३ नौकांच्या माध्यमातून ३० हजार कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत.

रायगड जिल्ह्यात वर्षाला सरासरी ४५ हजार मेट्रिक टन मासेमारी करण्यात येते. मात्र मागील काही वर्षात जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन घटत चालले आहे. सध्या ३९ हजार मेट्रीक टन मत्स्य उत्पादन झाले आहे. त्यातच प्रमुख माशांच्या प्रजातींचेही उत्पादन घटल्याने मासेमारांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. सरकारी उदासिनतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील कंपन्यांचे रासायनिक पाणीही समुद्रात सोडण्यात येत असल्याने मत्स्य उत्पादन घटले असल्याचे मच्छिमार सांगतात.

प्राक्कलन समितीच्या निकषानुसार मत्स्य विभागामार्फत मासळीची मोजणी केली जाते. सलग तीन वर्षे उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाल्यास मत्स्य दुष्काळ जाहीर करता येतो. मात्र, रायगड जिल्ह्यात अशी परिस्थिती नसल्याने जिल्ह्यात मत्स्य दुष्काळ नसल्याचे रायगडचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
मत्स्य उत्पादनवाढीसाठी कोकणात दर्जेदार बंदरांचा विकास होणे गरजेचं आहे. मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणारा एकही प्रकल्प जिल्ह्यात नाही. शीतगृह, मत्स्य प्रक्रिया केंद्र सुरू होऊ शकलेले नाही. कोकणातल्या इतर दोन जिल्ह्यांतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. मत्स्य व्यवसायात सुधारणा झाल्यास मासेमारांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात घट झाली असतानाच बाजारात जास्त दर असलेल्या जिताडे, पाला, रावस, दाडा, ताम, वाम आणि शेवंड या जातीच्या मासळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे मासेमारांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात सध्या पापलेट, सुरमई, रावस, भाकस, कोलंबी, माकुल, मांदेळी, बांगडा, बोंबिल या जातींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने मासेमारांना थोडा दिलासा मिळाला आहे.

मत्स्य उत्पादन घटले असतानाच स्थानिक मासेमारांपेक्षा दलाल दिवसेंदिवस श्रीमंत होत असल्याचे दिसून येत आहे. दलाल किरकोळ भावात मासेमारांकडून मासळी खरेदी करतात व दामदुप्पट दरात बाजारात विकतात. यामुळे मासेमारांना फायदा मिळण्यापेक्षा दलालांच्याच तुंबड्या भरल्या जातात. जिल्ह्यात मासेमारांच्या छोट्या-मोठ्या सुमारे १०० संस्था आहेत. मात्र या संस्थांमार्फत मासेमारांनी पकडलेली मासळी बाजारात निर्यात करण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात आलेली नाही

First Published on: March 1, 2022 8:46 PM
Exit mobile version