खोट्या कागदपत्रांच्या आधारे उपविभागीय अधिकारी कार्यालयाची फसवणूक

खोट्या कागदपत्रांच्या आधारे उपविभागीय अधिकारी कार्यालयाची फसवणूक

महा़ड: जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करुन ती खरी असल्याचे भासवून त्यांचा वापर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केलेल्या दाव्यात करणार्‍या आणि या आधारे मिळकत आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करणार्‍या बारा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महाडचे तलाठी अजित धाबेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार या बारा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संजय पुरुषोत्तम खोडके, संतोष पुरुषोत्तम खोडके, सुधीर पुरुषोत्तम खोडके, सुजाता राजेंद्र खोडके, अमित राजेंद्र खोडके, ओंकार राजेंद्र खोडके, अमृता विवेक बामणे, राहुल रामनाथ पिंपळकर, प्रसाद रामनाथ पिंपळकर, योगिता संतोष गुजर, ज्योती सत्तपा वर्णे आणि रेखा सखाराम काकडे (सर्व रा. महाड) या बारा जणांचा समावेश आहे.
या बारा जणांनी ४१८७ आणि ४२५० या क्रमांकाचे बनावट फेरफार उतारे तयार करुन ही मिळकत त्यांच्या नावे होण्यासाठी महाडच्या उपविभागीय अधिकार्‍यांकडे दावा दाखल केला होता.ही कागदपत्रे बनावट असतानाही ती खरी आहेत हे भासवून उपविभागीय अधिकारी यांची फसवणूक केली जात होती. हा प्रकार १४ फेू्ब्रुवारी २०२० ते १४ मार्च २०२३ या कालावधीत घडला. उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून केलेल्या चौकशीमध्ये हे फेरफार बनावट असल्याचे आढळून आल्याने व कार्यालयाची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने तलाठी धाबेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यानंतर या प्रकरणी या बारा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे अधिक तपास करत आहेत.

 

First Published on: May 25, 2023 9:57 PM
Exit mobile version