50 आरोग्य केंद्रांना शासकीय जागा देणार-पालकमंत्री आदिती तटकरे

जिल्हाधिकाऱ्यांच्या मनधरणीनंतर पालकमंत्री तटकरेंचा बहिष्कार मागे

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा भक्कम कारण्याचे प्रयत्न सुरू असून, 50 आरोग्य उपकेंद्र आणि सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासकीय जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वडखळ आणि सुधागड येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व उप जिल्हा रुग्णालयात किमान 100 खाटांची सुविधा विकसित केली जाणार असल्याची माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

2013 साली जिल्ह्यातील दुर्गम भागांसाठी आरोग्य उप केंद्र मंजूर झाली होती. मात्र जागेअभावी ही केंद्र अद्याप सुरू होऊ शकली नव्हती. अशा 50 आरोग्य उप केंद्रांसाठी शासकीय जागा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यापैकी 30 उप केंद्रांसाठी जागा हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. उर्वरीत 20 साठी लवकरच शासकीय जागा उपलब्ध व्हावी, याकरिता प्रयत्न सुरू आहेत. महाड येथील रुग्णालयाला उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न असून, महाड आणि पनवेल येथे ट्रॉमा केअर सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात असल्याचे त्या म्हणाल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तालुक्यातील उसर येथील 53 एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. या इमारतीचे काम सुरू होऊन पूर्ण होत नाही तोपर्यंत कुरूळ येथील आरसीएफ वसाहतीत महाविद्यालयासाठी तात्पुरत्या इमारती आणि जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन लेक्चर ह़ॉल आणि ग्रंथालय सुरू करण्यात येत आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून 100 विद्यार्थ्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

ग्रामविकास मंत्रालयाकडून 40 प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यापैकी 29 उपलब्ध झाल्या असून, उर्वरित लवकरच येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून रुग्णवाहिका दिल्या जातील. म्हणजेच यावर्षी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन आणि सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

First Published on: May 25, 2021 7:23 PM
Exit mobile version