पनवेल परिसरात फोफावतोय बेकायदेशीर सावकारी व्यवसाय, कामोठेमध्ये गुन्हा दाखल

पनवेल परिसरात फोफावतोय बेकायदेशीर सावकारी व्यवसाय, कामोठेमध्ये गुन्हा दाखल

पनवेल परिसरात व्याजाने पैसे देण्या-घेण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. घरगुती अडचण सांगून अनेक जण सावकारांकडून कर्ज घेतल आहेत. यात दवाखाना, मुलांचे शिक्षण, लग्न आणि ईतर कार्यासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण अधिक आहे. कामोठे येथे सावकारी व्यवसाय करण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना व्याजाने पैसे देऊन जबरदस्तीने व्याज दराने व्याज आकारल्याप्रकरणी कपिल महानोर व विराट विश्वनाथ ढगे (दोघेही राहणार कामोठे) यांच्याविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गरजेला पैसे उपलब्ध व्हावे म्हणून अनेकांना खासगी सावकाराच्या वळचणीतला जावे लागते. त्यातून पाच टक्के ते २० टक्के व्याजाची आकारणी होती. शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य कष्टकरी लोक, व्यापारी, नोकरदार, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक इतकेच काय तर सराफांनाही व्याजाने पैसे दिले जातात. यातील बर्‍याच सावकाराकडे सावकारी व्यवसाय करण्याचा परवाना नसल्याचे समोर आले आहे. मात्र अशांवर कारवाई होत नसल्याने हा व्यवसाय फोफावत चालला आहे. समोरच्या व्यक्तीची कुवत पाहून सावकार मंडळी कर्ज देतात. वेळ पडली तर एका दिवसात लाखो रुपयांपर्यंतची रोख रक्कम देणारी सावकार मंडळी पनवेलमध्ये असून, कर्जदारांना महिन्याकाठी तीन टक्क्यांपासून दहा टक्क्यांपर्यंत व्याज लावले जाते. किरकोळ विक्रेत्याला सकाळी पाचशे रूपये व्यवसायाला दिले की रात्री व्यवसाय संपल्यावर त्याच्याकडून सहाशे रूपये गोळा करणारे सावकार आहेत.

गरज सरेल म्हणून धुणीभांडी करणार्‍या बाईपासून ते अनेक व्यापारी खासगी सावकाराकडून उसने पैसे घेतात. मात्र त्यांच्या व्याजाचा दणका इतका असतो की कर्जदार त्यातच रूतत जातात. शेवटी कर्ज फिटत नाही आणि सावकाराचा तगादाही संपत नाही. एक हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत सावकाराकडून महिन्याकाठी ५ टक्के, दहा टक्के, १५ टक्के,२० टक्के दराने कर्ज घेतात. ज्या दिवशी कर्ज घेतले जाते तेव्हापासून पुढील महिन्यातील तारखेला न चुकता ठरलेले व्याज सावकारांना द्यावे लागते. व्याजाची रक्कम चुकली की त्यावर व्याजाला व्याज लावले जाते.

कामोठे येथील सेक्टर १० मधील अंकुश मोहिते यांनी कपिल महानोर यांच्याकडून पाच लाख रुपये दहा महिन्यांसाठी व्याजाने घेतले होते. यावेळी त्यांनी फ्लॅटचे कागदपत्र स्वतःकडे ठेवून घेतले. ते पैसे व्याजासह मोहिते यांनी परत दिले. त्यानंतर पुन्हा काही पैसे मोहिते यांनी व्याजाने घेतले. तसेच विराट विश्वनाथ ढगे यांच्याकडून देखील एक लाख ४० हजार रुपये व्याजाने घेतले होते. यावेळी ढगे याच्याकडे कर्जाच्या रकमेचा हिशोब मागितला असता तो हिशोब देण्यास टाळाटाळ करू लागला व पैसे परत न दिल्यास शिवीगाळ करून मोहिते याना मारण्याची धमकी दिली. सावकारी व्यवसाय करण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना व्याजाने पैसे देऊन जबरदस्तीने व्याज दराने व्याज आकारल्याप्रकरणी कपिल महानोर व विराट विश्वनाथ ढगे यांच्याविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

First Published on: February 15, 2022 9:12 PM
Exit mobile version