रायगड जिल्ह्यातील तृणधान्याचे क्षेत्र वाढणार

रायगड जिल्ह्यातील तृणधान्याचे क्षेत्र वाढणार

अलिबाग-: बदलत्या काळात सुदृढ आरोग्यासाठी आहारात तृणधान्यांचा वापर वाढविण्यासाठी रायगड जिल्ह्यात सुरू असलेले काम उल्लेखनीय असून, तृणधान्याखालील क्षेत्र हे आगामी दोन वर्षात पाच हजार हेक्टर होण्यासाठी कृषी विभाग, जिल्हा प्रशासन आणि शेतकरी यांच्या सहकार्याने विशेष भर देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. ( District Collector Kishan Jawle Ask will increase the area of ​​cereals in Raigad district)

कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले, आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, समन्वय अधिकारी स्मार्ट प्रकल्प सतीश बोर्‍हाडे, कृषी विकास अधिकारी मिलिंद चौधरी, उप विभागीय कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर, प्रकल्प उपसंचालक आत्मा भांडवलकर उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागणीनुसार २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. या अंतर्गत तृणधान्याचे उत्पादन वाढविणे, त्याच्या पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढविणे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तृणधान्याच्या वापर आणि उत्पादन वाढीसाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. तसेच विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. या वर्षभरात राबविलेल्या कार्यक्रमांमुळे तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढले असल्याचे जावळे यांनी स्पष्ट केले. तसेच मोठ्या प्रमाणात तृणधान्यावरील प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे उत्पादन वाढले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी कृषी अधिकारी बाणखेले यांनी तृणधान्याविषयी जागृती करण्यासाठी, तसेच मागील आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. समन्वय अधिकारी स्मार्ट प्रकल्प बोर्‍हाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या निमित्ताने तृणधान्यांपासून बनविलेल्या पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला जिल्हाधिकारी जावळे यांनी भेट दिली. तसेच शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांना सन्मानित करण्यात आले. कृषी विभागाच्या योजनांची माहिती, तृणधान्यापासून विविध पाककृतीची माहिती देणार्‍यां पुस्तकिचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

First Published on: March 13, 2024 9:17 PM
Exit mobile version