उद्योजक किसन भोसले यांचा महात्मा गांधी पुरस्कार-२०२३ ने सन्मान

उद्योजक किसन भोसले यांचा महात्मा गांधी पुरस्कार-२०२३ ने सन्मान

पोलादपूर-:
हजारों शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, असाध्य आजाराने पिडीतांना वैद्यकिय मदत करुन आपल्या समाजबांधवांच्या पाठीशी पहाडा सारखे उभे राहणारे उद्योजक किसन भोसले (udyojak kisan bhosle) यांना नुकताच युवक क्रांती दल आणि महात्मा गांधी पुरस्कार समितीच्यावतीने महात्मा गांधी पुरस्कार-२०२३ हा मानाचा पुरस्कार (mahatma gandhi award) कोथरूड येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळयात प्रदान करण्यात आला.


मध्यम वर्गीय किसन भोसले आणि परिवार मागील २० वर्षांपासून पुण्यातील येरवडा परिसरातील कल्याणी नगरमध्ये वास्तव्यास आहेत. येरवडा येथे त्यांचे पानाचे दुकान आणि चंदननगर परिसरातील खराडी गावात एका बैठया घरात लेथ मशिनवर छोटे वाहनांचे पार्ट तयार करण्याचा व्यवसाय होता.शहराचा विकास होत असताना रस्ता रुंदीकरणात पान शॉप गेले. त्यामुळे हाती असणार्‍या छोटया पार्ट बनविण्याच्या उद्योगाकडे त्यांनी भावंडासह लक्ष घातले.त्यासाठी प्रामुख्याने व्यवसायातले बारकावे, ज्ञान, कौशल्य आत्मसात केले. आपल्यातील असणारी जिद्द कल्पकता आणि माणुसकीचे नाते जपण्याची अविष्कारी देणगी यामुळे त्यांनी या उद्योगाला आपलेसे करत अनेकांनी मने जिंकली.त्यामुळे छोटेखानी असलेल्या या उद्योगाने एक मोठया उद्योग विश्वासत झेप घेतली.भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज या नावाने पुण्याच्या चाकण येथे कारखान्याच्या रूपात उभा राहिला. पाहता पाहता या इवल्याशा रोपटयाचे रुपांतर विशाल वृक्षकायेत झाले.वडगाव शेरी, कोल्हापूर येथे कारखान्याच्या शाखा सुरु झाल्या. माणुसकीचा धर्म पाहणार्‍या किसन भोसलेंनी जात व धर्म न पाहता तब्बल ४०० तरुणांना रोजगाराची संधी दिली.आपल्या कारखान्यात काम करणारा हा कामगार नसून तो आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याचे ते नेहमी सांगतात त्यामुळे त्यांनी एखाद्या कुटुंब सदस्याप्रमाणे प्रत्येकांशी अतूट नाते जोडले आहे.आपण शून्यातून विश्व निर्माण केले हे सांगताना त्यांनी कधीही जुन्या प्रसंगांना सोडून दिले नाही त्यातून आलेल्या अनुभवांचे ते नेहमीच कथन करत पुढे जात राहिले.

हाताशी असणारा उद्योग न सोडता त्यातून त्यांनी स्वत:चा वेगळं उद्योग विश्वाच जणू निर्माण केले आहे.त्यांनी कधी कुणाशीही नातेमोड केली नाही.त्यामुळेच किसन भोसले पुण्यातील पोलादपूर तालुका रहिवासी संघाच्या माध्यमातून तालुक्यातील मुळचे असलेले पुणे पिंपरी चिंचवड भागात व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास असलेल्या बहुजन समाजातील बांधवांचे ते पालक झाले. या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सदैव मदतीचा हात शहरी आणी ग्रामीण भागातील बांधवांसाठी पुढे केला आहे. पुणे, मुंबई आणि पोलादपूर तालुक्यातील कुणाचेही लग्नाचे मंगल कार्य असू द्यात त्यांना कुटुंब सदस्य म्हणून स्थान दिले जाते.पुण्यात किंवा तालुक्यात सांस्कृतिक कार्यक्रम असो, हरिनाम सप्ताह असो, किंवा जत्रोत्सव यात किसन भोसले यांचे योगदान मोठे आहे.कोरोनाच्या काळात त्यांनी माणुसकी भिंत ही अधिक घट्ट करुन ठेवली आहे. त्यावेळी त्यांनी गावागावात मदतीचा आणि आर्थिक पाठबळाने अनेक कुटुंबांना सावरले आहे. त्यामुळेच त्यांना महात्मा गांधी यांच्या नावाने मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

First Published on: November 2, 2023 9:35 PM
Exit mobile version