उदंड झाला दौर्‍यांचा सोहळा, भरपाईच्या नावे मात्र भोपळा!

उदंड झाला दौर्‍यांचा सोहळा, भरपाईच्या नावे मात्र भोपळा!

तौत्के वादळानंतर मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, विरोधी पक्षनेते, केंदीय मंत्री यांच्यासह अनेकांनी नुकसानीचा आढावा घेण्यासाठी कोकणात दौरे केले. मात्र भरपाईच्या नावाने मात्र कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसल्यामुळे उदंड झाला दौर्‍यांचा सोहळा, जनतेच्या हाती मात्र भरपाईच्या नावाने भोपळा, अशी अवस्था असल्याचे परखड वक्तव्य शेकापक्षाचे नेते आणि माजी आमदार पंडित पाटील यांनी केले आहे.

17 मे रोजी आलेल्या चक्रीवादळाला आठ दिवस उलटूनही अद्याप नुकसानग्रस्तांना कशी आणि किती भरपाई देणार, याबाबत चकार शब्द कोणीही काढलेला नसल्याने कोकणातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. दौर्‍यांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारकडे भरपाईसाठी बोट दाखवले, तर मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र कसा दुजाभाव करते हे सांगण्याचा प्रयत्न केला.

पण भरपाईबाबत कुणी काही बोलले नाही. मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या निकषांप्रमाणे भरपाई देण्यात येईल असे संकेत दिले आहेत. मागील वर्षी झालेल्या निसर्ग वादळानंतर असेच वादळ पर्यटन दौरे झाले. शासनाच्या नियमावलीत बदल करून निसर्ग वादळग्रस्तांना सुपारीच्या झाडाला 50 रुपये, तर नारळाच्या झाडाला 250 रुपयांची भरघोस मदत मिळवून दिल्याचे दावे करीत अनेकांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानल्याचे पाटील म्हणाले. प्रत्यक्षात निसर्ग चकीवादळाची मदत अजून पोहचलेली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

शेतकर्‍यांना तातडीने मदत करण्याची मागणी पाटील यांनी केली. भविष्यात वादळाच्या संकटात वाढ होण्याची भीती हवामान आणि पर्यावरण संशोधक व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भूमिगत वीजवाहक यंत्रणा उभारणे, शासकीय इमारतींच्या आराखड्यात बदल करणे, चक्रीवादळग्रस्तांना निवार्यासाठी कायमस्वरुपी पक्क्या शेड उभारणे, मासेमारी बोटी सुरक्षित राहण्यासाठी यंत्रणा उभारणे, बागायतींचे संगोपन याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच दौर्‍यांचा फार्स आता बंद करा, असा सल्लाही त्यांनी संबंधितांना दिला.

First Published on: May 25, 2021 7:18 PM
Exit mobile version