रायगड लोकसभा निवडणुकीत महिलाच ठरणार ‘किंगमेकर’

रायगड लोकसभा निवडणुकीत महिलाच ठरणार ‘किंगमेकर’

अलिबाग-; निवडणुकीत प्रत्येक मताला महत्व आहे.एका मतानेही सत्तेचा सारीपाट विस्कटून जातो.याचा प्रत्यय आतापर्यंतच्या निवडणुकीत अनेकदा आला आहे. त्यामुळे एक मत नशिब उजळू शकते किंवा सत्तेपासून दूर नेऊ शकते. याच कारणामुळे उमेदवारांकडून मतदारसंघातील सर्वच मतदारांचा मत रूपी आशीर्वाद घ्यावा लागतो. लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा दोन्ही निवडणुकीत उमेदवारांना ‘स्त्री-शक्ती‘ तारणार आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवंनवीन फंडे वापरले जात आहेत. (Raigad Lok Sabha elections, women will be the ‘kingmaker’)

२००८ साली निर्माण करण्यात आलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये रायगड जिल्हयातील चार आणि रत्नागिरीतील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून रायगड लोकसभेची अंतिम मतदार यादी सुध्दा प्रसिध्द झाली आहे.सहा विधानसभा मतदार संघातील १६ लाख ५३हजार ९३५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.यात ८ लाख ३ हजार १५ पुरुष तर ८ लाख ४० हजार ४१६ महिला मतदार आहेत. रायगड लोकसभा पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या ही अधिक असून २६हजार ९०१ महिला मतदार आहेत. ही आकडेवारी बघता रायगड लोकसभा मतदारसंघात महिलाच ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यात असणार्‍या पनवेल,कर्जत, उरण, हे विधानसभा मतदार संघ मावळ लोकसभा मतदारसघांत तर पेण, अलिबाग, महाड, आणि श्रीवर्धन हे विधान सभा मतदार संघ रायगड लोकसभा मतदार संघात येत आहेत.तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर हे दोन मतदार विधान सभा मतदार संघ रायगड लोकसभा मतदार संघात येत असून पेण वगळता इतर सहा विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या ही जास्त आहे.

First Published on: March 18, 2024 9:24 PM
Exit mobile version