पेणमधील भात शेती पाण्याखाली

पेणमधील भात शेती पाण्याखाली

पेणमधील भात शेती पाण्याखाली

सतत चार दिवस मुसळधार पावसामुळे पेणमध्ये पूरसद़ृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भात शेतीत पाणी साचल्याने रोपे कुजून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गडब, वडखळ, आमटेम, खारपाले, कासू, पांडापूर, कोळवे, खारपाडा, जिते, बोरी, कळवे, जोहे, तांबडशेत भागातील शेतात पाणी साचले आहे. नुकतीच लावणी केलेली भाताची रोपे पाण्याखाली असून, त्या छोट्या रोपांना सूर्यप्रकाश न मिळाल्याने वाढीची प्रक्रियाच मंदावली आहे. त्यामुळे रोपे कुजून वाया जाणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याचे नुकसान होणार आहे. पावसाचा जोर आता काहीसा कमी झाला असला तरी शेतात साचलेले पाणी आणि पुराचा गाळ पिकावर बसल्याने रोपांना त्याचा फटका बसून उत्पन्नावर परिणाम होणार आहे.

मुसळधार पावसानंतर अंबा, भोगावती, पाताळगंगा, बाळगंगा नद्यांच्या प्रवाहाचा विळखा तालुक्याला कायमच पडतो. या नद्यांच्या प्रवाहाचे पाणी धरमतर खाडीला मिळते. गेले चार दिवस या नद्या आक्राळविक्राळ रूप धारण करीत धोक्याची सीमारेषा ओलांडून वाहत होत्या. नद्यांच्या प्रवाहाचे पाणी, समुद्राला आलेली भरती आणि पाऊस त्यामुळे संपूर्ण ग्रामीण भागातील शेतांमध्ये पाण्याची पातळी वाढली. शिवारात पाणी भरल्याने खरीपात काम करणारा शेतकरी पावसामुळे घरातच अडकला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीची लावणी पूर्ण होत असतानाच पुराचे पाणी घुसल्याने रोपे कुजून नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी विभाग, संबधित अधिकारी आणि तलाठी यांना शेतीच्या नुकसानीची पाहाणी करुन पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांनी दिले आहे.


हेही वाचा – अलमट्टी विसर्ग आत्ताच कसा वाढवता येईल त्यासाठीचा प्रयत्न गरजेचा – फडणवीस

First Published on: July 24, 2021 7:33 PM
Exit mobile version